Latest News

Latest News
Loading...

दुचाकीस्वाराचा मोबाईल हिसकावणाऱ्या तीनही चोरट्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

प्रशांत चंदनखेडे वणी 

मोबाईलवर बोलत असलेल्या दुचाकीस्वाराचा मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्यांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले असून पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या तीनही चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्या जवळून पोलिसांनी चोरीचे तीन वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. 

शहरालगत असलेल्या चिखलगाव येथील महादेव नगरी येथे राहणाऱ्या विकास पुरुषोत्तम ढेंगळे (४२) यांनी ते शिवाजी पार्क जवळ मोटारसायकलवर मोबाईलवर बोलत असतांना मागून दुचाकीने आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांचा मोबाईल हिसकावून पळ काढल्याची तक्रार १३ जुलैला पोलिस स्टेशनला नोंदविली. ११ जुलैला ते वणी येथे कामानिमित्त आले असता शिवाजी पार्क जवळून जातांना त्यांच्या मोबाईलवर फोन आला. त्यामुळे त्यांनी दुचाकी हळू केली व ते मोबाईलवर बोलत होते. दरम्यान मागून सुसाट आलेल्या तीन दुचाकीस्वारांनी क्षणात त्यांचा मोबाईल हिसकावून दुचाकीने पळ काढला. विकास ढेंगळे यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. पण ते दुचाकी दामटत पळाले. २० ते २५ वर्षे वयोगटातील हे चोरटे असल्याचे विकास ढेंगळे यांनी तक्रारीत म्हटले होते. तसेच चोरट्यांच्या दुचाकीचा नंबरही त्यांनी तक्रारीत नोंदविला होता. 

मोबाईलवर वार्तालाप करीत असतांना दिवसाढवळ्या चोरट्यांनी मोबाईल हिस्कावाल्याची घटना घडल्याने पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेत शीघ्र तपासचक्रे फिरविली. खबऱ्यांना अलर्ट करून दुचाकीचा शोध लावला. आणि दुचाकीचा ताबा असलेल्या तरुणाला अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्या कडून त्याच्या दोन साथीदारांची नावेही पोलिसांनी वदवून घेतली. नंतर त्या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. या चोरट्यांचा इतर मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये तर सहभाग नाही ना, याकरिता पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली. आधी ते तिघेही उडउडवीची उत्तरे देऊ लागले. मात्र त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणांवरून आणखी दोन मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. 

पोलिसांनी त्यांच्या जवळून विकास ढेंगळे यांच्या हिसकावलेल्या मोबाइलसह (१८०००) अन्य दोन मोबाईल (३००००) जप्त केले. तसेच गुन्ह्यात वापरलेली होंडा युनिकोर्न मोटारसायकल (MH २९ BL ००९१) किंमत ५० हजार रुपये असा एकूण ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तसेच पोलिसांनी मयूर गजानन बत्तुलवार (२२) रा. शिवनेरी चौक, महेताब ईल्ताब शहा (२४) रा. गोकुळ नगर, प्रद्युग्न उर्फ बॉबी क्रिष्णा कुरेकार (२२) रा. साई मंदिर चौक या तीनही मोबाईल चोरट्यांना अटक करून त्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. 

सदर कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गोपाल उंबरकर, डीबी पथकाचे पोउपनि धीरज गुल्हाने व डीबी पथकाने केली. 


No comments:

Powered by Blogger.