Latest News

Latest News
Loading...

वणी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांचे ज्वलंत प्रश्न व समस्यांना घेऊन काँग्रेसचे धरणे आंदोलन

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांचे ज्वलंत प्रश्न व समस्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यांच्या नेतृत्वात २३ जुलैला तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता पासून या आंदोलनाला सुरवात होईल. या धरणे आंदोलनात जनतेने मोठ्या संख्येने सहभाग नोंदविण्याचे आवाहन आंदोलनाचे समन्वयक संजय खाडे यांनी केले आहे. 

वणी विधानसभा क्षेत्रातील नागरिक सध्या अनेक समस्यांशी झुंजत आहेत. त्यांच्या समस्या सोडविण्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यांना भेडसावत असलेल्या प्रश्नांकडेही दुर्लक्ष केले जात आहे. शासन नागरिकांची एकप्रकारे पिळवणूक करीत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनाही शासनाकडून अद्याप कुठलाही दिलासा मिळालेला नाही. शेतकरी संकटात सापडलेला असतांनाही शासनाकडून शेतकऱ्यांवर अन्याय होतांना दिसत आहे. शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार व सर्वसामान्य जनता शासनाच्या अन्यायकारक धोरणांत होरपळत आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, वीज ग्राहक व महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात तथा या क्षेत्रातील समस्यांना घेऊन काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. संजय खाडे यांच्या समन्वयातून काँग्रेस द्वारा तहसील कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. 

आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये वीज बिल माफ करावे, विजेची सातत्याने उपलब्धता करून द्यावी, शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, पिकांना हमी भाव द्यावा, महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये कठोर कार्यवाही करावी, वणी परिसरातील मुलभूत सुविधा व नागरी समस्या तात्काळ सोडवाव्यात, बेरोजगारांचे प्रश्न सोडवावेत आदी मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांना घेऊन करण्यात येणाऱ्या धरणे आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संजय खाडे यांनी केले आहे. 

नागरिकांच्या समस्या जैसे थेच – संजय खाडे

वणी उपविभागात शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अतिवृष्टीमुळे घरे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतीसाठी वीजपुरवठ्याचा प्रश्न अजूनही जैसे थेच आहे. वीज आणि पाणीपुरवठ्याच्या समस्यांमुळे वणीकर त्रस्त आहेत. शहरात 8-8 दिवस पाणीपुरवठा होत नाही. घाणीची व आरोग्याची समस्या कायम आहे. या समस्यांवर वारंवार निवेदने देऊनही प्रशासन त्यांचे निराकरण करण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

 

No comments:

Powered by Blogger.