प्रशांत चंदनखेडे वणी
मुंबई बल्लारशाह नंदीग्राम एक्सप्रेसखाली येऊन एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना १७ जुलैला सकाळी ११.४० वाजताच्या सुमारास चिखलगाव ते वांजरी रेल्वे गेटदरम्यान घडली. नंदीग्राम एक्सप्रेस ही मुंबई वरून वणी रेल्वे स्टेशनवर येत असतांना हा अपघात घडला. युवकाने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली, की रेल्वेच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला हे मात्र अद्याप कळू शकले नाही. शिवबालक पटेल (२९) रा. रीवा, मध्यप्रदेश असे या मृत युवकाचे नाव आहे. युवक रेल्वेखाली आल्याचे लोको पायलटच्या लक्षात येताच त्याने प्रवासी रेल्वे थांबविली. या घटनेमुळे नंदीग्राम एक्सप्रेस ही बराच वेळ घटनास्थळी थांबली होती.
नंतर ही माहिती वणी स्टेशन मास्टरला देण्यात आली. त्यानंतर घटनेबाबत पोलिसांना कळविण्यात आले. तसेच रेल्वे पोलिसांनाही घटनास्थळावर पाचारण करण्यात आले. स्थानिक पोलिस व रेल्वे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मृतक युवक हा वणी-चिखलगाव रोडवरील एका नामांकित बियरबारमध्ये काम करीत होता. बियरबारच्या वरच्या माळ्यावरच तो अन्य कामगारांसोबत राहायचा. सकाळी तो काही तरी काम असल्याचे कारण सांगून बियरबार मधून बाहेर पडला आणि रेल्वेखाली येऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याने आत्महत्त्या केल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. मात्र अजून ते स्पष्ट होऊ शकले नाही. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: