प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक हा नेहमी रहदारीने गजबजलेला असतो. या चौकात नागरिकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल पाहायला मिळते. या चौकाच्या चहू बाजूंनी विविध वस्तू, साहित्य व खाद्यपदार्थांची मोठमोठी दुकाने आहेत. चौकात मोठमोठे हॉटेल्स देखील आहेत. या चौकातच वेगवेगळ्या शासकीय विभागांचे कार्यालये आहेत. या चौकापासून हाकेच्या अंतरावर पोलिस स्टेशन, तहसील कार्यालय व न्यायालय आहे. एवढेच नाही तर या चौकात प्रथम श्रेणी दिवाणी न्यायालय सुद्धा सुरु झाले आहे. या चौकात ऑटोही मोठ्या प्रमाणात थांबलेले असतात. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकात नेहमी वर्दळ दिसून येते. गुरुवार १७ जुलैला दुपारी वर्दळीच्या या चौकात एकच तारांबळ उडाली. एका व्यक्तीने भर चौकात ऑटो चालकावर बंदूक रोखली आणि नागरिक सैरवैर झाले.
अचानक त्या व्यक्तीने ऑटो चालकावर बंदूक रोखताच नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. एका व्यक्तीने भर चौकात ऑटो चालकावर बंदूक रोखल्याची वार्ता नंतर पोलिसांच्या कानावर पडताच पोलिसांनी शीघ्र घटनास्थळाकडे धाव घेत त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याला पोलिस स्टेशनमध्ये आणून त्याची चौकशी केल्यानंतर त्याच्या जवळ असलेली बंदूक ही खरीखुरी बंदूक नसून बनावट बंदूक असल्याचे पोलिस तपासत पुढे आले. शेतात पक्षी उडविण्याकरिता किंवा जत्रेत लागणाऱ्या दुकानांमध्ये फुगे फोडण्याकरिता वापरण्यात येणारी ही बंदूक असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. मात्र या घटनेने काही काळ शहारत प्रचंड गोंधळ व खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. बंदूक जवळ बाळगणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या चर्चेने रान उठले होते. भर चौकात एका व्यक्तीने ऑटो चालकावर बंदूक रोखल्याची वार्ता वाऱ्यासारखी शहरात पसरली आणि प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने ही चर्चा चघळू लागला.
एक व्यक्ती स्वतःजवळ जवळ बंदूक बाळगून असल्याची वार्ता पोलिसांच्या कानावर पडताच काही काळ पोलिसांचीही भंबेरी उडाली होती. परंतु पोलिसांनी सावधगिरीने त्या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर समोर आलेल्या तथ्यावरुन पोलिसही थक्क झाले. त्या व्यक्ती जवळ असलेली बंदूक ही खेळण्यातील बंदूक असल्याचे पोलिस तपासात पुढे आले. ही विनोदी घटना असली तरी या घटनेने काही काळ शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. एका व्यक्ती जवळ बंदूक असल्याची वार्ता कळल्यानंतर शहरवासीयांबरोबरच पोलिसांच्याही भुवया उंचावल्या होत्या. परंतु त्या व्यक्ती जवळ असलेली बंदूक बनावट असल्याचे समोर आल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.
बनावट बंदूक जवळ बाळगणारा व्यक्ती हा खाजगी सुरक्षा रक्षक असून ज्या ऑटो चालकाला त्याने बंदुकीची भीती दाखविण्याचा प्रयत्न केला तो त्याच्या परिचयाचाच असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघांमध्ये आपसी वाद असल्याने सुरक्षा रक्षकाने ही फिल्मी शक्कल लढवून त्याच्याशी वैर असलेल्या त्या व्यक्तीमध्ये भीती निर्माण करण्याचा हा कुटील प्रयत्न केला. मात्र ही कुरापत आता त्याच्या चांगलीच अंगलट आली आहे. या उपद्रवी कृत्यामुळे त्याला पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. सुरक्षा रक्षकाची ही मजाक पोलिसांचा वेळ दवडणारी तर शहरवासीयांच्या मनात धास्ती भरविणारी ठरली.
No comments: