प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील गोकुळनगर परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. घाण कचऱ्यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांच्या घरासमोर घाणपाणी साचून राहत असल्याने त्यातून येणाऱ्या दुर्गंधीने नागरिकांचे श्वास घेणे कठीण झाले. या परिसरात मूलभूत सोइ सुविधांचाही मोठा अभाव आहे. सांडपाणी वाहून नेण्याकरिता नाल्या नाहीत. जाणे येणे करण्याकरिता पक्के रस्ते नाहीत. हा परिसर विकासापासून कोसो दूर राहिला आहे. विकासाची गंगा या परिसराकडे अजूनही वळली नसल्याचे पाहायला मिळते. लोकप्रतिनिधी व नगर पालिकेच्या दुर्लक्षितपणाचा फटका या परिसराला बसला. नगर पालिकेच्या सोइ सुविधांपासून येथील नागरिक अद्यापही वंचित आहेत. शहरातील गल्लीबोळात सिमेंट रस्ते व भूमिगत नाल्या बांधण्यात आलेल्या असतांना या परिसरातील नागरिकांच्या नशिबी उपेक्षाच आली आहे.
स्वच्छ व सुंदर शहराची दवंडी पिटणाऱ्या नगर पालिका प्रशासनाला हा परिसर आरसा दाखविणारा ठरला आहे. विकासकामांचं अवडंबर माजविणाऱ्या नगर पालिकेचं डोळे मिटून दूध पिण्यासारखं काम सुरु आहे. शहरातील काही भाग अजूनही नगर पालिकेच्या विकासाला मुकले आहेत. येथील नागरिकांच्या अर्ज विनंत्याकडेही लक्ष दिले जात नाही. विकासकामे करतांना मोठ्या प्रमाणात दुजाभाव होत असल्याच्या बोलक्या प्रतिक्रिया आता नागरिकांमधून व्यक्त होऊ लागल्या आहेत. गोकुळ नगरच्या बाबतीतही नेमके हेच झाले आहे. गोकुळ नगर परिसराला नगर पालिकेकडून नेहमी सावत्रपणाची वागणूक मिळाली असल्याच्या प्रतिक्रिया येथील नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. तेंव्हा शहराचा सर्वांगीण विकास साधल्याचा बडेजाव करणाऱ्या नगर पालिका प्रशासनाने गोकुळ नगर परिसराकडेही विकास दृष्टी फिरवावी अशी मागणी येथील नागरिकांमधून होऊ लागली आहे.
दीपक चौपाटी कडून लालगुडा चौपाटीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गोकुळ नगर वसले आहे. गोकुळ नगर ही मोठी नागरी वस्ती आहे. या परिसरातील नागरिक नगर पालिकेच्या मूलभूत सोइ सुविधांपासून अजूनही वंचित आहेत. गोकुळ नगरचा गॅस गोदामाकडील भाग पूर्णतः घाणीने वेढलेला आहे. अगदी नागरिकांच्या घरासमोर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्याच्या कडेला घाणपाणी साचले आहे. जिकडे तिकडे केरकचरा पडला आहे. घाणीच्या दुर्गंधीने येथील नागरिक बेजार झाले आहेत. दुर्गंधीमुळे नागरिकांचे श्वास घेणे कठीण झाले आहे. घाणीच्या साम्राज्यात येथील नागरिकांना जीवन कंठावे लागत आहे. या परिसरात अद्यापही काँक्रीट रस्ते बांधण्यात आलेले नाहीत. भूमिगत गटार व नाल्या बांधण्यात आलेल्या नाहीत. गोकुळ नगर परिसराकडे नगर पालिकेचे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. अस्वच्छता व घाणीमुळे येथील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. त्यामुळे नगर पालिकेने गोकुळ नगर परिसराकडेही विकासाच्या नजरेतून बघावे अशी मागणी गोकुळ नगर वासियांमधून होऊ लागली आहे.
No comments: