Latest News

Latest News
Loading...

लग्नानंतर काही दिवसातच पती पासून विभक्त झालेल्या नवविवाहितेने बहिणीच्या घरी घेतला गळफास

प्रशांत चंदनखेडे वणी 

तरुण विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १९ जुलैला सकाळी उघडकीस आली. सहा महिन्यांपूर्वीच तिचा विवाह झाला होता. मात्र काही कारणांमुळे पती पत्नीत खटके उडू लागले आणि ती आपल्या माहेरी निघून आली. मागील दोन महिन्यांपासून ती आपल्या मोठ्या बहिणीकडे शिक्षणाच्या उद्देशाने राहत होती. तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली होती. शहरात तिने शिकवणी वर्ग देखील लावले होते. एका खाजगी शैक्षणिक संस्थेत तिचे ऍडमिशनही झाले होते. मात्र अचानक तिने वणी मुकुटबन रोडवरील साईलीला नगरी येथे किरायाने राहत असलेल्या आपल्या बहिणीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने नैराश्येतून आत्महत्या केल्याचे बोलल्या जात आहे. आरती जय बुरचूंडे (२८) असे या गळफास घेतलेल्या नवविवाहितेचे नाव आहे.

वणी तालुक्यातील कुंभारखनी येथे राहणाऱ्या आरतीचा विवाह सहा महिन्यांपूर्वी वरोरा शहरातील आनंदवन येथे राहणाऱ्या जय बुरचूंडे या युवकाशी झाला होता. जय बुरचुंडे हा वेकोलिच्या कोलारपिंपरी कोळसाखाणीत कार्यरत आहे. लग्न झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच त्यांच्यात खटके उडायला लागले. दोघांचेही एकमेकांसोबत पटेनासे झाले. त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. अशातच आरतीने पतीचे घर सोडून माहेर गाठले. ती आई वडिलांसोबत राहू लागली. मात्र नंतर तिने आत्मनिर्भर बनण्याचा निर्धार करून ती आपल्या बहिणीकडे राहायला आली. तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. शिकवणी वर्गही लावले होते. एका खाजगी शैक्षणिक संस्थेत तिचे ऍडमिशन देखील झाले होते. त्यामुळे शिक्षणाच्या उद्देशाने मागील दोन महिन्यांपासून ती साईलीला नगरी येथे आपल्या बहिणीकडे राहत होती. 

मात्र नैराश्येतून तिने बहिणीच्याच घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. १८ जुलैला रात्री सर्वांनी सोबत जेवण केल्यानंतर ते सर्व जण झोपले. मात्र सकाळी खूप उशीर होऊनही आरती झोपेतून उठली नसल्याने बहिणीने तिच्या खोलीत जाऊन पाहिले. पण ती खोलीत नव्हती. त्यामुळे बहिणीने वरच्या माळ्यावरील बेडरूममध्ये जाऊन बघितले असता आरती ही पंख्याला दुपट्ट्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यामुळे बहिणीने एकच किंचाळी फोडली. ती प्रचंड हादरली होती. तिने लगेच आपल्या पतीला उठवून ही माहिती दिली. त्यानंतर घरच्या सर्व मंडळींनी वरच्या माळ्याकडे धाव घेतली. 

ही माहिती नंतर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. आरतीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लग्न होऊन जेमतेम ६ महिने झाले होते. सांसारिक जीवनाचा परिपाठही तिला कळला नव्हता. अंगावरची हळद व हातावरची मेहंदीही अजून सुकली नव्हती, की तिने जगाचा निरोप घेतला. तिने असा हा आत्मघाती निर्णय घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून पोलिस तपासातून ते निष्पन्न होणार आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे. 

  

No comments:

Powered by Blogger.