जनतेचे प्रश्न व समस्या सोडविण्याला आमदार आजही देतात प्राधान्य, १५ वर्षांपासून बंद असलेली बससेवा आमदारांच्या प्रयत्नांनी झाली सुरु
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर वणी वरून भालर-तरोडा या मार्गावर बससेवा सुरु झाली आहे. तब्बल १५ वर्षानंतर या मार्गावर बससेवा सुरु झाल्याने गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या मार्गाने बससेवा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांच्याही शिक्षणाच्या प्रवासातील अडथळे दूर झाले आहेत. वणी वरून भालर, लाठी, बेसा, निवली, तरोडा असा या बसचा मार्ग राहणार असून या मार्गावर बस सुरु झाल्याने येथील नागरिकांना आता सुरक्षित प्रवास करता येणार आहे. बससेवेमुळे या गावातील नागरिकांच्या प्रवासाचे प्रश्न सुटले असून दीर्घ कालावधीनंतर गावातून बस सुरु झाल्याने विद्यार्थी व गावकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आमदार संजय देरकर यांच्याकडे गावकऱ्यांनी व्यथा मांडल्यानंतर त्यांनी आगार व्यवस्थापकांशी चर्चा करून बससेवा सुरु करण्याचा मार्ग मोकळा करून दिला. वणी वरून तरोड्यासाठी बस सुरु होताच गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. गावागावात बसचे स्वागत करून बस चालकाचा सत्कारही करण्यात आला. विशेष म्हणजे वणी आगारातून तरोड्याकरिता निघालेल्या या बसमध्ये चक्क किरण देरकर यांनी प्रवास केला.
वणी वरून तरोडा मार्गे एसटी महामंडळाची बससेवा सुरु नसल्याने विद्यार्थी व गावकऱ्यांना प्रवासात मोठे अडथळे निर्माण व्हायचे. या गावातील नागरिकांना शहरात जाणे येणे करतांना मोठ्या अडचणी निर्माण व्हायच्या. त्यामुळे गावकऱ्यांनी विशेषतः महिलांनी आमदार संजय देरकर यांच्याकडे आपली व्यथा मांडली. आमदार देरकर यांनी महिलांची मागणी गांभीर्याने घेत तात्काळ आगार व्यवस्थापकांशी याबाबत चर्चा केली. वणी तरोडा मार्गे बससेवा सुरु व्हावी, याकरिता ते प्रचंड आग्रही होते. त्यांनी या मार्गावर बससेवा सुरु करण्याकरिता आगार व्यवस्थापकांकडे सतत पाठपुरावा केला. शेवटी त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आणि वणी वरून तरोड्यासाठी बस सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र गावातून बस सुरु करण्याकरिता ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक असल्याने मनोज ढेंगळे यांनी ग्रामपंचायतींकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळवून देण्याकरिता प्रमुख भूमिका वठविली.त्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या वणी आगारातून तरोड्यासाठी बस सुरु झाली. या बस मधून आमदार संजय देरकर यांच्या अर्धांगिनी व सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा किरण देरकर यांनी सहकारी महिलांसोबत प्रवास केला. या बसचे गावागावात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. गावातून बस सुरु झाल्याने गावकऱ्यांनी एक प्रकारे आनंदोत्सव साजरा केला. यावेळी बस चालकाचाही विशेष सन्मान करण्यात आला. दीर्घ प्रतिक्षेनंतर वणी वरून तरोडा मार्गे बससेवा सुरु झाल्याने विद्यार्थी व गावकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. आमदार संजय देरकर हे गावकऱ्यांच्या समस्या व प्रश्न गांभीर्याने घेत असल्याचा प्रत्यय या निमित्ताने परत एकदा गावकऱ्यांना आला. आमदार संजय देरकर यांच्या प्रयत्नांमुळे तब्बल १५ वर्षानंतर वणी वरून भालर, लाठी, बेसा, निवली व तरोड्याकरिता बससेवा सुरु झाल्याने गावकऱ्यांमधून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
No comments: