Latest News

Latest News
Loading...

एका छोट्याश्या गावात राहणाऱ्या स्नेहाची गरुड भरारी, जिद्द व मेहनतीच्या जोरावर गाठले तिने यशाचे शिखर

प्रशांत चंदनखेडे वणी 

चंद्रपूर जिल्ह्यातील ग्राम बीबी या छोट्याशा गावात राहणाऱ्या स्नेहा राजेंद्र काकडे या विद्यार्थिनीने मोठा पराक्रम केला आहे. तिने भारतातील सर्वोच्च शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या गुवाहाटी येथील आयआयटी मास्टर ऑफ डिझाईन या प्रतिष्ठित पदयुत्तर अभ्यासक्रमासाठी यशस्वी प्रवेश मिळविला आहे. जिद्द, मेहनत व चिकाटीच्या जोरावर तिने या कठीण अभ्यासक्रमाची पायरी गाठली आहे. तिने मनात धेय्य बाळगून घेतलेली ही गरुड झेप इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी ठरली आहे. या विद्यार्थिनीने सातत्यपूर्ण अभ्यास व अथक परिश्रमातून आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. एका छोट्याश्या गावातून एका मोठ्या अभ्यासक्रमासाठी तिने घेतलेली भरारी ही परिस्थिती व अपुऱ्या साधनांचा बागलबुवा करणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे एक आदर्श ठरली आहे. गुणवंत असण्याबरोबरच तिच्या अंगी विविध कलागुणही आहेत. ती एखाद्याच्या चेहऱ्याचे हुबेहूब चित्र रेखाटते. तिने रेखाटलेले चित्र अगदीच जिवंत वाटतात. त्यामुळे तिच्या यशाचं व तिच्या अंगी असलेल्या प्रतिभेचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. 

स्नेहा ही केवळ एक गुणवंत विद्यार्थिनीच नाही, तर एक असामान्य प्रतिभेची चित्रकार सुद्धा आहे. ती कोणाचाही चेहरा अत्यंत हुबेहूब रंगवू शकते. तिने रेखाटलेले चित्र अगदीच जिवंत वाटतात. तिच्या हातातील कलेमुळे तिने काढलेले चित्र हे सजीव वाटतात. त्यामुळे चित्र पाहतांना पाहणाऱ्यांच्याही डोळ्यांना भुरळ पडावी एवढी वास्तविकता तिच्या चित्रांमध्ये असते. आणि त्यामुळेच देशभरातील हजारो उमेदवारांमधून निवडक विद्यार्थ्यांमध्ये या प्रतिभाशाली कलाकाराची निवड झाली आहे. हे या विद्यार्थिनीच्या बुद्धिमत्ता व परिश्रमाचे फलित आहे.

गावात मर्यादित सुविधा असतानाही स्नेहाने आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा थांबवला नाही. तिने अभ्यास, सराव आणि स्वतःवरील विश्वासाच्या जोरावर ही मोठी झेप घेतली. तिच्या या यशामुळे संपूर्ण बिबी गावात आनंदाचे वातावरण आहे. तिने एका छोट्याश्या गावात राहून मोठं यश मिळविल्याने गावकऱ्यांना तिच्याबद्दल प्रचंड अभिमान व हेवा वाटत आहे.

तिने संपादन केलेल्या या अभूतपूर्व यशामुळे तिच्यावर गावकरी, शिक्षक, मित्रपरिवार आणि संपूर्ण परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. गावं लहान असलं तरी स्वप्न मोठी असावी लागतात, हे स्नेहाने दाखवून दिलं आहे. स्वप्न सर्वच बघतात पण ती पूर्ण करण्याची जिद्द, मेहनत व आत्मविश्वास ज्याच्या अंगी असतो, तोच यशाचे शिखर गाठतो. स्नेहाने आपल्या यशाचे श्रेय्य आई, वडील व गुरुजनांना दिले आहे. अशक्य असं काहीच नसतं, फक्त धेय्य गाठण्याचं सामर्थ्य स्वतात असावं लागतं, असा सूचक संदेश तिने शैक्षणिक भवितव्य घडवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला आहे.  


No comments:

Powered by Blogger.