एक सच्चा मार्गदर्शक हरपला, दिलीप कोरपेनवार सरांचं अपघाती निधन, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रावर पसरली शोककळा
प्रशांत चंदनखेडे वणी
वरोरा चिमूर मार्गावर झालेल्या भीषण अपघातात वणी येथील समाजसेवी व्यक्तिमत्व व नगर परिषद शाळा क्रमांक ८ चे उच्च श्रेणी मुख्याध्यापक दिलीप नारायण कोरपेनवार (५७) रा. रविनगर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ते चिमूर येथे मालवाहू पिकअपने काही कामानिमित्त जात असतांना तळोदी शिवारात भरधाव टँकरने पिकअपला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात दिलीप कोरपेनवार सरांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना लगेच वरोरा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. ही घटना २० जुलैला पहाटे घडली.
मुख्याध्यापक दिलीप कोरपेनवार सर हे काही कामानिमित्त मालवाहू पिकअप वाहनाने चिमूर येथे जात होते. ते पिकअपमध्ये प्रवासी बसतात त्या बाजूने बसले होते. दरम्यान तळोदी शिवारात भरधाव टँकरने पिकअप वाहनाला समोरून जोरदार धडक दिली. कोरपेनवार सर ज्या बाजूने बसले होते, नेमकी त्याच बाजूने पिकअप वाहनाला टँकरची धडक बसल्याने कोरपेनवार सर हे गंभीर जखमी झाले. त्यांना लगेच वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत नियतीने आपला डाव साधला होता. तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. कोरपेनवार सरांचा अपघात झाल्याची वार्ता नंतर वाऱ्यासारखी शहरात पसरली. त्यानंतर शहरातील अनेकांनी वरोरा येथे धाव घेतली.
दिलीप कोरपेनवार हे नगर परिषद शाळा क्रमांक ८ चे उच्च श्रेणी मुख्याध्यापक होते. वणी नगर सेवा समितीचे ते अध्यक्ष होते. त्यांनी शहरात अनेक सामाजिक उपक्रम राबविले. समाजकार्यात त्यांचं उदंड योगदान राहिलं. त्यांच्या पुढाकारातून विविध सामाजिक उपक्रमांना चालना मिळाली. हजारो वृक्षांची लागवड त्यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. सामाजिक दातृत्वातून त्यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांना आधार दिला. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य घडविण्यात त्यांनी हातभार लावला. अनेक विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनात घडले आहेत. एक आदर्श शिक्षक व व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा सर्वच क्षेत्रात आदर केला जायचा. सर्वांशी सलोखा जपणारा त्यांचा स्वभाव होता. सुस्वभावी व मनमिळाऊ व्यक्तिमत्व म्हणून ते सर्व परिचित होते.
त्यांचे अपघातात दुर्दैवी निधन झाल्याने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अपघाती निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्यावर असा हा अकाली मृत्यू ओढावल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या जाण्याने एक आदर्शवादी विचारसरणी जोपासणारं व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना प्रत्येकच क्षेत्रातून व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्त परिवार आहे. दिलीप कोरपेनवार सरांच्या अपघाती निधनाने एक सच्चा मार्गदर्शक हरपला आहे.
( सरांना लोकसंदेश न्यूज परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)
No comments: