धो धो बरसणाऱ्या पावसाने नदी नाले भरले तुडुंब, निर्गुडा नदीच्या पुलावरून वाहू लागले पुराचे पाणी, प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरात पावसाने थैमान घातले आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून शहरात धो-धो पाऊस पडत आहे. कोसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरले असून नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. शहरात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. कधी मुसळधार तर कधी संततधार पाऊस पडत असल्याने जनजीवन प्रभावित झाले आहे. सर्वदूर दमदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला असला तरी अतिवृष्टीचा धोका निर्माण झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. संततधार पावसामुळे ग्रामीण भागात घरे पडल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने पुराचा धोकाही निर्माण झाला आहे. शहराजवळून वाहणारी निर्गुडा नदी प्रचंड फुगली आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गणेशपूर मार्गावरील निर्गुडा नदीच्या पुलाला पुराचे पाणी टेकले असून मोक्षधाम कडून मुकुटबन मार्गाकडे जाणाऱ्या निर्गुडा नदीच्या पुलावरून पुराचे पाणी वाहू लागले आहे. त्याचप्रमाणे घुग्गुस मार्गावरील हिरानी ले-आऊट येथे मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. पावसाचा कहर अद्यापही सुरूच असल्याने नागरिक प्रचंड काळजीत आले आहेत.
शहरात सुरु असलेल्या मुसळधार व संततधार पावसामुळे नागरिकांचं दैनंदिन जीवन प्रभावित झालं आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून शहरासह तालुक्यात सारखा पाऊस पडत आहे. कोसळधार पावसामुळे नदी नाल्यांचा पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला आहे. नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. नाल्यांचाही पाण्याचा ओढा वाढला आहे. नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. संततधार पावसाने ग्रामीण भागासह शहरी वस्त्यांमध्येही पाणी साचल्याने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. प्रशासन पूर परिस्थितीवर बारीक लक्ष ठेऊन आहे. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे तालुक्यातील वांजरी, खांदला, निवली या गावातील घरांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. तसेच नगर पालिका हद्दीत येणाऱ्या हिरानी ले-आऊट परिसरात पावसाचे पाणी साचल्याने येथील नागरिकांचे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.
प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा
मागील काही दिवसांपासून शहरासह तालुक्यात तीव्र स्वरूपाच्या जलधारा कोसळत असल्याने पूर परिस्थिती उद्भवण्याचा धोका वाढला आहे. नदी नाल्यांची पाण्याची पातळी प्रचंड वाढली आहे. धो धो बरसणाऱ्या पावसाने चिंता निर्माण केली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांना सावधानता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. पूर परिस्थिती उद्भवणाऱ्या ठिकाणी शक्यतो जाऊ नये. पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यास पायदळ किंवा वाहनाने पूल पार करण्याचा प्रयत्न करू नये. आकाशात विजांचा कडकडाट होत असल्यास सुरक्षित ठिकाणी जावे, झाडाखाली थांबू नये. पुराच्या पाण्याजवळ, धारण क्षेत्रात व पर्यटन ठिकाणी जाऊन सेल्फी व रिल बनविणे टाळावे, अशा प्रकारे सतर्कतेचे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे. ८ जुलैला रात्री ८ वाजतापासून तर सकाळी १० वाजता पर्यंत जिल्ह्यात सरासरी ३३.४० टक्के पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर यापुढेही कायम राहणार असून आता पर्यंत १८ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. केळापूर तालुक्यातील सायखेडा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
No comments: