वेकोलि सुरक्षा रक्षकांनी दोन चोरटे पकडले, सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे वेकोलि परिसरात चोरीचा डाव उधळला
प्रशांत चंदनखेडे वणी :-
वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्रातील घोन्सा ओसीएम (WCL) परिसरात दोन चोरट्यांना रंगेहात पकडण्यात सुरक्षा रक्षक व MSF पथकाला यश आले. पण त्यांचे अन्य साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरले. सुरक्षा रक्षकांनी पकडलेल्या या चोरट्यांच्या ताब्यातून दोन बॅटऱ्या, दोन मोबाईल तसेच तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई गुरुवारी (दि. 21 ऑगस्ट) पहाटे करण्यात आली.
रात्री पेट्रोलिंगदरम्यान संशयितांना पकडले
घोन्सा ओसीएम येथे सुरक्षा प्रभारी म्हणून कार्यरत गयाप्रसाद रामप्रसाद केवट (वय 51, रा. वणी) यांच्या नियंत्रणाखाली दररोजप्रमाणे सुरक्षा रक्षकांची रात्रपाळी ड्युटी लावण्यात आली होती. 20 ऑगस्ट रात्री 10 वाजता पासून ते 21 ऑगस्ट सकाळी 6 वाजेपर्यंत सुरक्षा रक्षक पेट्रोलिंग करत होते.
या दरम्यान पहाटे 3.30 वाजता ड्युटीवरील सुरक्षा रक्षक गणेश भालचंद्र आवारी यांनी सुरक्षा प्रभारींना फोन करून माहिती दिली की, WCL परिसरात चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोन संशयितांना पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून बॅटऱ्या, मोबाईल तसेच एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
दोन्ही चोरटे रंगेहात सापडले
घटनेची खातरजमा करण्यासाठी सुरक्षा प्रभारी गयाप्रसाद केवट घटनास्थळी पोहोचले असता, दोन तरुणांना वेकोलि सुरक्षा रक्षक व MSF पथकाने पकडून ठेवले होते. चौकशीत त्यांनी आपली नावे राजवीर रमेश कोली (22) व सिद्धार्थ रमेश थोराण (19, दोन्ही रा. गोकुळनगर, वणी) अशी सांगितली.
त्यांच्या जवळील नायलॉनच्या पिशवीत दोन बॅटऱ्या आढळल्या –
पोपटी व पांढऱ्या रंगाची सक्षम फेन्सींग एनरजायझर कंपनीची बॅटरी (सिरीयल क्र. SAK 107543) व काळ्या रंगाची एक्साइड पॉवर सेफ प्लस बॅटरी (मॉडेल EP 26/12, 12V, 26AH, सिरीयल क्र. 40Q070801004180) अशा दोन बॅटऱ्या या चोरट्यांजवळ आढळून आल्या. तसेच दोन मोबाईल (Vivo व Redmi), बजाज पल्सर मोटारसायकल (MH 29 AC 3430) यासह त्यांच्या इतर साथीदारांनी घटनास्थळावरून पसार होताना सोडून दिलेल्या दोन मोटारसायकली हिरो स्प्लेंडर (MH 29 AB 6479) व बजाज प्लॅटीना (MH 29 AQ 1357) सुरक्षा रक्षकांच्या हाती लागल्या.
शेतकऱ्याने दिली चोरीची तक्रार
दरम्यान सकाळी वणी पोलीस ठाण्यात जेव्हा हा मुद्देमाल जमा करण्यासाठी सुरक्षा अधिकारी गेले असता, तेथे मिलन बाबाराव आस्कर (वय 24, रा. बोर्डा, ता. वणी) नावाचा शेतकरी तक्रार देण्यासाठी आला होता. त्याने पोलिसांना सांगितले की, त्याच्या शेतातील दोन बॅटऱ्या चोरीस गेल्या आहेत. सुरक्षा रक्षकांनी जप्त केलेल्या मुद्देमालातील बॅटऱ्या पाहिल्यावर त्या त्याच्याच असल्याचे शेतकऱ्याने ओळखले. त्यामुळे कोली व थोराण या दोन चोरट्यांनी बोर्डा शिवारातून बॅटऱ्या चोरल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांत गुन्हा दाखल
या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात आरोपी राजवीर रमेश कोली व सिद्धार्थ रमेश थोराण यांच्याविरुद्ध कलम 122 महाराष्ट्र पोलीस कायदा सह कलम 303(2), 3(5) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.
सुरक्षा रक्षकांचे कौतुक
WCL परिसरात सतत चोरी व घुसखोरीच्या घटना घडत असल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. या कारवाईमुळे मोठी चोरी टळली असून सुरक्षा रक्षकांनी दाखवलेल्या तत्परतेचे परिसरात कौतुक होत आहे.
No comments: