प्रशांत चंदनखेडे वणी:-
मारेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार उमेश बेसरकर यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार 23 ऑगस्टला सकाळी घडली. मृत्यू समयी त्याचं वय 56 वर्षांचं होतं. उमेश बेसरकर हे 2 महिन्यांपूर्वी मारेगाव पोलिस स्टेशन येथे बदलीवर आले होते. यापूर्वी ते पुसद पोलिस स्टेशनला कार्यरत होते. मारेगाव पोलिस स्टेशनला कर्तव्य बजावत असताना त्यांना अचानक व्हृदय विकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
सकाळी 10 वाजता त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना आधी मारेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर नंतर त्यांना वणी येथील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र येथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांच्या निधनाची वार्ता पोलिस वर्तुळात पसरताच पोलिस विभागात दुःखाची लाट पसरली. त्यांच्यावर असा हा दुर्दैवी मृत्यू ओढवल्याने पोलिस विभागासह संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होतांना दिसत आहे.
उमेश खुशाल बेसरकर हे कर्तव्यनिष्ठ ठाणेदार म्हणून ओळखले जायचे. गुन्हेगारी क्षेत्रावर नियंत्रण मिळविण्याकरता त्यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यतत्पर व तडफदार अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहायलं जायचं. वणी येथील प्रेम नगर परिसरात धाड टाकून त्यांनी जबरदस्ती देहविक्रीच्या धंद्यात ढकललेल्या दोन महिलांची सुटका केली होती. धडाकेबाज कारवायांसाठी ते ओळखले जायचे. त्यांच्या निधनाने पोलिस वर्तुळावर शोककळा पसरली आहे. कुटुंबं दुखसागरात बुडालं आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा आप्त परिवार आहे.
No comments: