प्रशांत चंदनखेडे वणी
वणी शहरातील शास्त्रीनगर भागात दारूच्या नशेत गवंडी कामगाराने विनाकारण एका मजुरास शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना गुरुवारी (दि. 21 ऑगस्ट) दुपारी घडली.
प्राप्त माहितीनुसार, संदिप साधुजी गौरकार (वय 42, रा. शास्त्रीनगर, वणी) हे मजुरी करून उदरनिर्वाह करतात. गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास ते आपल्या भावाच्या (विनोद गौरकार) शास्त्रीनगर येथील पानठेल्यासमोर उभे असताना मंदर येथील गोपाल कवडु बुरटकर (वय 35) हा दारूच्या नशेत तेथे आला. त्याने संदिप गौरकार यांना विनाकारण गलिच्छ भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यावेळी गौरकार यांनी विरोध केला असता आरोपीने “तु कोण मला बोलणारा” असे म्हणत अश्लील भाषेत शिवीगाळ केली व थापडाबुक्क्यांनी मारहाण केली. घटनेदरम्यान योगेश पावडे, विनोद गौरकार व किसन पोतराजे यांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले. मात्र, आरोपीने “तु मला ओळखत नाहीस, मी कोण आहे” असे म्हणत पुन्हा मारण्याची धमकी दिल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी संदिप गौरकार यांनी वणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून आरोपी गोपाल कवडु बुरटकर याच्याविरुद्ध बीएनएसच्या कलम ११५(२), २९६, ३५१(२), ३५१(३), ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वणी पोलिस करीत आहेत.
No comments: