Latest News

Latest News
Loading...

आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वणी पोलिस स्टेशन येथे पार पडली शांतता समितीची सभा


प्रशांत चंदनखेडे वणी :-

आगामी सण उत्सव शांततेत कसे साजरे करता येईल याविषयी सर्व समाज प्रमुखांची मते जाणून घेण्याकरिता तसेच सण उत्सव साजरे करतांना निर्माण होणाऱ्या समस्या व अडचणी यावर चर्चा करण्याकरिता वणी पोलिस स्टेशन येथे शांतता समितीची सभा घेण्यात आली. शांतता समितीच्या सभासदांसह सर्व समाज प्रमुखांनी या सभेला आपली उपस्थिती दर्शविली. आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या सभेत तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडला. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही ही सभा समस्या व तक्रारींच्या काहुळात पार पडली. उपस्थितांनी या सभेत शहरातील विविध समस्या व तक्रारींचा पाढाच वाचला. शांतता समितीच्या काही सभासदांनी आक्रमकपणे समस्या मांडल्या. त्यामुळे शांतता समितीची ही सभा देखील नेहमी सारखीच वादळी ठरली.

एसडीपीओ सुरेश दळवे यांच्या अध्यक्षतेखाली व ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या नेतृत्वात घेण्यात आलेल्या या सभेत महसूल विभाग, नगर पालिका, महावितरण, वणी वाहतूक उपविभाग, बांधकाम विभाग, पंचायत समिती व इतरही विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या सभेत तक्रारींचा अक्षरशः खच पडला. तक्रारींचा दबून असलेला हुंकार या सभेतून बाहेर पडला. मोकाट जनावरांच्या प्रश्नावर अनेकांनी नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना घेरले. मोकाट कुत्र्यांचाही बंदोबस्त करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

शासकीय मैदानावरील हायमाक्स लाईट अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याचेही न.प. अधिकाऱ्यांच्या स्मरणात आणून दिले. शहरातील रस्त्यांची कामे रखडली असल्याच्याही तक्रारी वाचण्यात आल्या. स्वातंत्र्य दिनाचे महत्व जाणून आदल्या रात्री पुतळे स्वच्छ करणे गरजेचे होते, पण त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. नगर पालिकेच्या प्रवेश द्वारासमोरच अतिक्रमणाचा विळखा आहे, त्याकडेही डोळेझाक केली जाते. मुख्य रस्त्यांवर व पुतळ्यांच्या अवती भोवती छोटी मोठी दुकाने लावली जातात, त्यामुळे पुतळ्यांच्या सौंदर्यीकरणाला कुठलेही महत्व उरत नाही. आणि रहदारीला देखील अडथळे निर्माण होतात. त्यामुळे नगर पालिकेने याकडे लक्ष देण्याच्या जोरदार सूचना शांतता समितीच्या सभेतून करण्यात आल्या.

वीजेच्या समस्येवरही कडाडून प्रहार करण्यात आला. वीज पुरवठा वारंवार खंडित होणे, अकारण वीज गुल होणे आणि सतत वीजेचा लपंडाव सुरु असणे याबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित करून महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेरले. तसेच वाढती गुन्हेगारी, वाहतुकीची समस्या, मुलींची छेडखानी, तरुणांमध्ये वाढती व्यसनाधीनता आणि धूमस्टाईल बाइकस्वारांचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपताना समाजातील प्रत्येकाने कायदा व सुव्यवस्था कशी अबाधित राखता येईल, याकडे लक्ष दिले पाहिजे, असा सूरही शांतता समितीच्या या सभेत उमटला. त्याचप्रमाणे गणेश मंडळांनाही काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या.

डीजेच्या आवाजावर नियंत्रण ठेवणे, मंडपावरील भोंग्यांचा आवाज कमी ठेवणे, वातावरण प्रदूषित होणार नाही याची काळजी घेणे, पर्यावरणावर विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घेणे, इको फ्रेंडली गणेश उत्सव साजरा करण्यावर भर देणे व सामाजिक सलोखा वृद्धिंगत होईल असे वातावरण निर्माण करणे, अशा लक्षवेधी सूचना या सभेतून गणेश मंडळांना देण्यात आल्या. शांतता समितीच्या या सभेला समितीचे सर्व सभासद, सर्व समाज प्रमुख, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, सुज्ञ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

No comments:

Powered by Blogger.