प्रशांत चंदनखेडे वणी :-
वणी शहरालगत असलेल्या पटवारी कॉलनी येथे किरायाने राहणाऱ्या युवकाला जुन्या वादातून बेदम मारहाण करून त्याच्यावर चाकूने हल्ला चढविण्यात आला. चाकू हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला आहे. तसेच मध्यस्थी करण्यास गेलेल्या घरमालकालाही चाकू मारून जखमी करण्यात आले. ही घटना २१ ऑगस्टला सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. याबाबत पोलिस स्टेशनला तक्रार देण्यात आल्याने पोलिसांनी आरोपीवर विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रशांत गिरीधर पुसाम (३२) हे पटवारी कॉलनी येथे राहुल पितांबर सातघरे यांच्या घरी किरायाने राहतात. ते ट्रक चालक म्हणून काम करतात. ते मूळचे वणी तालुक्यातील बोरगाव येथील रहिवाशी आहेत. पटवारी कॉलनी येथे त्यांच्या घराशेजारी राहणारा जिवन भिमराव सातघरे (३२) हा कुठल्या ना कुठल्या कारणावरून त्यांच्याशी नेहमी वाद घालत असतो. तसेच घरमाकाशीही तो विनाकारण वाद घालतो. जिवन सातघरे हा विनाकारण वाद घालून त्रास देत असल्याने राहुल सातघरे यांनी एक ते दीड वर्षांपूर्वी त्याच्या विरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार देखील नोंदविली होती. त्यातच २१ ऑगस्टला जिवन सातघरे याने प्रशांत पुसाम यांच्यासोबत विनाकारण वाद घातला.
प्रशांत पुसाम हे कोळसाखाणीत ट्रक घेऊन जात असतांना जेवणाची वेळ झाल्याने त्यांनी ब्राह्मणी फाट्यावर ट्रक उभा केला, आणि जेवण करण्याकरिता ते घराकडे जाण्यास निघाले. दरम्यान जिवन सातघरे याने त्यांना रस्त्यात गाठले. त्याने प्रशांत पुसाम यांना तुझ्या व तुझ्या घरमालकाच्या मुलांना मारतो, असा दम दिला. त्यावर प्रशांत पुसाम यांनी तू आमच्या मुलांना मारण्याची धमकी का देतो, असे विचारले असता त्याने प्रशांत पुसाम यांच्यासोबत वाद घालून त्यांना हाताबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यानंतर तो तेथून निघून गेला, व प्रशांत पुसामही घरी आले.
मात्र काही वेळाने तो प्रशांत पुसाम राहत असलेल्या घराजवळ आला, आणि जोरजोरात शिवीगाळ करू लागला. त्याच्या शिवीगाळ करण्याच्या आवाजाने घरमालक घराबाहेर आले, व त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु तो कुणाचे काही एक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने स्वतःजवळ बाळगून असलेल्या चाकूने थेट प्रशांत पुसाम यांच्यावर हल्ला चढविला. त्याने प्रशांत पुसाम यांच्या हाताच्या दंडावर, हनुवटीच्या खाली व दोन्ही पायांच्या टोंगळ्याजवळ चाकूचे वार केले. जिवन सातघरे याने चाकूचे वार केल्याने प्रशांत पुसाम हे गंभीर जखमी झाले. एवढेच नाही तर त्यांना वाचविण्याकरिता गेलेल्या घरमालकाच्याही हातावर आरोपीने चाकू मारल्याने तेही जखमी झाले आहेत.
हल्ल्यानंतर आरोपीने “पुढे भेटलात तर जीवे मारतो” अशी धमकी दिली व घटनास्थळावरून पसार झाला. चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रशांत पुसाम यांनी सरळ पोलीस स्टेशन गाठून जिवन सातघरे याच्या विरुद्ध तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी जिवन सातघरे याच्यावर बीएनएसच्या कलम 115(2), 118(1), 351(2), 351(3), 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: