उकणी येथे सोमवारी संजय खाडे यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे चक्काजाम आंदोलन, खाण परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेवर काँग्रेस आक्रमक
प्रशांत चंदनखेडे वणी :-
उकणीसह निलजई, जुनाड, नायगाव, कोलारपिंपरी कोळसाखाण परिसरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि विविध मागण्यांसाठी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून वेकोलिच्या कोळसाखाणींमुळे निर्माण झालेल्या समस्या व प्रश्नांना घेऊन काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहेत. सोमवार, दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता उकणी कोळसाखाण रोडवरील बसस्टॉप येथे काँग्रेस तर्फे तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्वात हे धगधगते आंदोलन होणार आहे.
रस्त्यांची दयनीय अवस्था – जीव धोक्यात
खाण परिसरातील गावांचे रस्ते वेकोलिच्या ओव्हरलोड कोळसा वाहतुकीमुळे पूर्णपणे उध्वस्त झाले आहेत. खड्डेमय रस्त्यांमुळे स्थानिक ग्रामस्थ आणि वेकोलि कामगारांना प्रवास करणे धोकादायक बनले आहे. या मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांत अनेकांनी प्राण गमावले असून शेकडो जखमी झालेत.
“वेकोलि प्रशासनाकडे कोट्यवधी रुपयांचा निधी असूनही गेल्या १०-१५ वर्षांत रस्त्यांची दुरुस्तीच झालेली नाही. हा अन्याय आता सहन केला जाणार नाही. प्रशासनाला जागे करण्यासाठी काँग्रेस हे आंदोलन छेडत आहे आणि न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील,” असे संजय खाडे यांनी ठणकावून सांगितले आहे.
काँग्रेसच्या प्रमुख मागण्या :
खाण बाधित क्षेत्रातील उकणी, पिंपळगाव, जुनाड, बोरगाव, भालर, निलजई, सुंदरनगर, निवली, बेसा, तरोडा, बेलोरा, नायगाव, कोलारपिंपरी या गावांचे रस्ते तातडीने दुरुस्त करावेत, उकणी गावातील उर्वरित १५% जमीन त्वरित संपादित करून गावकऱ्यांना वाढीव मोबदला द्यावा आणि वणी जवळ पुनर्वसन करावे, स्थानिकांना रोजगारात प्राधान्य द्यावे तसेच भांदेवाडा खदानातील डोजर, पीसी, डम्पर ऑपरेटरांना पुन्हा नियुक्त करावे, उकणी, पिंपळगाव, जुनाडा, प्रगती नगर येथील विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त बस सेवा तर उकणी गावासाठी स्वतंत्र स्कूल बस सुरू करावी, कोळशाच्या धुळीमुळे शेत पिकांच्या झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.
आंदोलनात सर्वांनी सहभाग घेण्याचे आवाहन
या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवा दल, एनएसयुआय, अल्पसंख्यांक व आदिवासी सेल यांचा सहभाग राहणार असून जनतेच्या न्याय हक्कांसाठी उभारण्यात आलेल्या या आंदोलनात परिसरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संजय खाडे यांनी केले आहे.
No comments: