Latest News

Latest News
Loading...

शेतकरी पुत्राची विष प्राशन करून आत्महत्या

प्रशांत चंदनखेडे वणी 

मुकुटबन पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोपापूर या गावातील युवकाने शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवार २४ ऑगस्टला दुपारच्या सुमारास उघडकीस आली. हा युवक शेतकरी पुत्र असून नैराश्येतून त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त होत आहे. गजानन लक्ष्मण चिकराम (३५) असे या विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या शेतकरी पुत्राचे नाव आहे.

वणी तालुक्यासह उपविभागात आत्महत्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. एका पाठोपाठ एक आत्महत्या होऊ लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. कुटुंबाचा आधार असलेले युवक नैराश्येतून मृत्यूचा मार्ग निवडू लागले आहेत. कुटुंबं प्रमुखही जीवनातील आव्हानांना सामोरे न जाता मृत्यूला कवटाळू लागले आहेत. शेतकरीही विवंचनेतून आत्महत्या करू लागले आहेत. कुठल्या ना कुठल्या कारणावरून तरुणांपासून तर गृहस्थांपर्यंत आत्महत्या करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालल्याने प्रशासनाने आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. 

मुकुटबन पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोपापूर या गावात कुटुंबासह राहत असलेल्या गजानन चिकाराम या शेतकरी पुत्राने शेतातच विषारी द्रव्य प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. त्याने विष प्राशन केल्याचे कुटुंबियांना कळताच त्यांनी त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. त्याच्या आत्महत्या करण्याने कुटुंबं दुःखसागरात बुडालं आहे. त्याने असा हा आत्मघाती निर्णय घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास मुकुटबन पोलिस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.