काँग्रेसच्या आंदोलनाने वठणीवर आले वेकोलि प्रशासन, संजय खाडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले चक्काजाम आंदोलन, तब्बल चार तास रोखून धरली कोळसा वाहतूक
प्रशांत चंदनखेडे वणी :-
वेकोलिच्या कोळसा वाहतुकीमुळे रस्त्यांची झालेली दुर्दशा आणि जनतेशी निगडित इतर मागण्यांना घेऊन काँग्रेस कमिटी वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने सोमवार २५ ऑगस्टला सकाळी ६.३० वाजतापासून उकणी बसस्टॉप जवळ भव्य चक्काजाम आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्वात हे लक्षवेधी जनआंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेसचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. जवळपास तीनशेच्या वर आंदोलक या आंदोलनात सहभागी झाले होते.
आंदोलनकर्त्यांनी तब्बल ४ तास वेकोलिची कोळसा वाहतूक रोखून धरली. कोळसा वाहतूक ठप्प पडल्याने कोळशाच्या पुरवठ्यावर त्याचा मोठा परिणाम झाला. त्यामुळे वेकोलि प्रशासन चांगलंच वठणीवर आलं. वेकोलि अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांशी चर्चा करून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने काँग्रेसने तूर्तास हे आंदोलन मागे घेतले. खाणबाधित क्षेत्रातील नागरिकांचे प्रश्न व समस्या सोडविण्यास वेकोलिने विलंब किंवा वेळकाढू धोरण अवलंबिल्यास याही पेक्षा मोठे व तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा यावेळी संजय खाडे यांनी वेकोलि प्रशासनाला दिला.
वेकोलि वणी नॉर्थ क्षेत्रांतर्गत येणाऱ्या कोळसाखाणींमुळे आसपासच्या गावातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वेकोलि प्रशासन समस्या सोडविण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत असून नागरिकांना मूलभूत सोइ सुविधा उपलब्ध करून देण्याचेही सौजन्य दाखवायला तयार नाही. वेकोलिच्या कोळसा उत्पादन व कोळसा वाहतुकीमुळे धूळ प्रदूषणाचा आधीच मार झेलणाऱ्या नागरिकांना खड्ड्यांनी व्यापलेल्या रस्त्यांवरून प्रवास करतांना आपले जीव गमवावे लागत आहे. कोळशाच्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहधारकांना वाहने चालविणे कठीण झाले आहे. छोट्या वाहनधारकांना तर या खड्डेमय रस्त्यांवरून वाहने चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्यांवर छोटे मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. अपघातात अनेक निष्पाप जीवांचे बळी गेले आहेत. तर कित्येकांना अपंगत्व आले आहे.
वेकोलिकडे कोट्यवधी रुपये असतांना देखील वेकोलि रस्त्यांची दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यातच कधी काळी वेकोलि कडून रस्त्याचे बांधकाम जरी करण्यात आले असले तरी ओव्हरलोड वाहतुकीच्या क्षमतेचे रस्ते मात्र बांधण्यात आले नाही. त्यामुळे अल्पावधीतच या रस्त्यांच्या बांधकामाचे पितळ उघडे पडले. वेकोलि परिसरातील रस्त्यांच्या समस्येला घेऊन नेहमी ओरड होते. पण वेकोलि प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते. परिणामी या रस्त्यांवर सतत अपघाच्या घटना घडतात आणि निष्पाप नगरीकांना आपले जीव गमवावे लागतात. वेकोलि प्रशासनाने रस्त्यांची झालेली दुरावस्था गांभीर्याने न घेतल्याने काँग्रेस प्रचंड आक्रमक झाली. काँग्रेसच्या नेते व पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून वेकोलि विरोधात तीव्र आंदोलन छेडले. आंदोलनकर्त्यांनी वेकोलिची कोळसा वाहतूक तब्बल चार तास बंद पाडली.
त्याचबरोबर वेकोलि प्रशासन कोळसाखाणी लगत असलेल्या गावातील नागरिकांची मोठी पिळवणूक करीत आहे. वेकोलि कडून गावकऱ्यांवर सातत्याने अन्याय करण्यात येत आहे. गावकऱ्यांना मूलभूत सोइ सुविधा पुरविण्याकडेही वेकोलि कायम दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेसने रस्ते दुरुस्तीसह उकणी, पिंपळगाव, जुनाडा आणि प्रगती नगर येथील विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त बससेवा सुरु करावी, उकणी गावासाठी स्वतंत्र बससेवा सुरु करावी, उकणी गावातील उर्वरीत १५ टक्के जमीन तात्काळ संपादित करण्यात यावी, गावकऱ्यांना घरांसाठी वाढीव मोबदला देण्यात यावा तसेच गावकऱ्यांचे वणी शहराजवळ पुनर्वसन करण्यात यावे तथा उकणी, पिंपळगाव, जुनाडा, कोलारपिंपरी, ब्राह्मणी, आणि निळापूर रोडच्या बाजूने शेती असलेल्या शेतकऱ्यांचे कोळशाच्या धुळीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे, त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, या न्यायिक मागण्या देखील करण्यात आल्या आहेत. या सर्व मागण्यांबाबत वेकोलि अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली असून यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासनही दिले आहे.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात काँग्रेसचे प्रमोद वासेकर, पुरुषोत्तम आवारी, अशोक चिकटे, वासूदेव विधाते, सुनील वरारकर, सतीश खाडे, बंडू बोंडे, बंडू गिरटकर, सुरेश ढपकस, प्रभाकर खोब्रागडे यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शविली. तसेच खाणबाधित गावातील रहिवासी, वेकोलि कर्मचारी, काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी हे मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. हे आंदोलन यशस्वी झाल्याने गावकरी व वेकोलि कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
No comments: