प्रशांत चंदनखेडे वणी :-
झरी तालुक्यातील गवारा शिवारात शेताच्या सीमारेषा व तारकंपाउंडच्या वादातून दोन गटांत प्रचंड हाणामारी झाली. या प्रकरणात दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध मारहाणीच्या तक्रारी दाखल केल्याने पोलिसांनी दोन्ही गटातील सदस्यांवर विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले आहेत. ही घटना ८ ऑगस्टला सायंकाळच्या सुमारास घडली.
प्रविन रामन्ना अलचेट्टीवार (वय २७, रा. गवारा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ८ ऑगस्ट रोजी सायं. ५ वाजता ते व त्यांची आई अनुसया शेतात असताना, निलेश ताणबा भोयर (वय ३४) यांनी शेतातील कंपाउंडचा पोल लाथ मारून तोडला व ताराचे नुकसान केले. याबाबत विचारणा करताच निलेश यांनी लाकडी काठीने प्रविण यांच्या डोक्यावर मारहाण केली. त्यावेळी सुनिल भोयर व अनिल भोयर यांनी त्यांना पकडून ठेवले तसेच त्यांच्या आईलाही धक्काबुक्की करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रविण अलचेट्टीवार यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी निलेश तानबा भोयर (३४), सुनिल भोयर (४०) व अनिल भोयर (३६) या तीन आरोपींवर बीएनएसच्या कलम ११८(१), ३२४(४), ३५१(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, निलेश रमेश भोयर (वय ३४, रा. गवारा) यांनीही याच घटनेबाबत प्रतितक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रविण अलचेट्टीवार यांनी त्यांच्या हिस्स्याच्या जमिनीत तारकंपाउंड उभारले होते. त्यांनी त्यांच्या शेताच्या हद्दीत येणारे तारकंपाउंड काढून टाकण्याची सूचना करूनही ते न काढल्याने, निलेश यांनी कंपाउंड तोडण्यास सुरुवात केली असता प्रविण यांनी वाद घालत शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी प्रविण यांचा भाऊ नवीन अलचेट्टीवार लाकडी काठी घेऊन आला व निलेश यांच्या डोक्यावर व हातावर मारून जखमी केले. तसेच रामन्ना अलचेट्टीवार यांनीही मारहाणीचा प्रयत्न केल्याचे निलेश यांनी म्हटले आहे. निलेश भोयर यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी प्रविण रामन्ना अलचेट्टीवार (२७), नवीन अलचेट्टीवार (२६) व रामन्ना अलचेट्टीवार (५०) या तीन आरोपींवर बीएनएसच्या कलम ११८(१), ३(५), ३५१(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही पक्षांच्या तक्रारी नोंदवून पोलीस तपास करीत आहेत.
No comments: