प्रशांत चंदनखेडे वणी
शहरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शहरात घरफोड्यांचे सत्र काही केल्या थांबत नसून चोरटे पोलिसांना गवसत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकत्याच घडलेल्या घटनेत चोरट्यांनी एका रात्रीत दोन ठिकाणी घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि वाहनाची नंबर प्लेट असा लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
माहितीनुसार, राहुल अरुण तागडे (३७) रा. साईलीला नगरी, वणी हे कुटुंबासह रक्षाबंधन निमित्त आकोला (ता. उमरेड, जि. नागपूर) येथे गेले होते. त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने घरी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. घर बंद असल्याने त्यांनी सुरक्षेकरिता लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज मोबाईल अप्लिकेशमध्ये तपासले असता त्यांना 10 ऑगस्टला पहाटे 1.52 वाजता एक अज्ञात इसम घराच्या गेटवरून आत प्रवेश करताना व दोन साथीदार रस्त्यावर उभे असल्याचे दिसले. चोरट्याने कॅमेऱ्याची दिशा बदलल्याने पुढील दृश्य रेकॉर्ड झाले नाही. त्यामुळे घरी चोरी झाल्याचा संशय आल्याने त्यांनी शेजारी राहणाऱ्या महिलेला फोन करून घराचा दरवाजा पाहायला सांगितला.
शेजारी राहणाऱ्या महिलेने त्यांच्या घराच्या दरवाज्याचे कुलूप तुटले असल्याची माहिती दिली. त्यामुळे अरुण तागडे हे तात्काळ घरी परतले. दुपारी १ वाजता ते घरी परतल्यानंतर त्यांनी घराची पाहणी केली असता त्यांना मुख्य दरवाज्याचा कुलूपकोंडा तुटलेला, कपाटे उघडी आणि सामान अस्ताव्यस्त अवस्थेत आढळले. कपाटातील 15 ग्रॅम सोन्याचे (किंमत ₹1,12,500) व 57 ग्रॅम चांदीचे (किंमत ₹71,250) असे एकूण ₹1,83,750 रुपये किमतीचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी पोलिस स्टेशनला येऊन अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
याच रात्री घराच्या मागील बाजूस राहणाऱ्या राजू श्रीराम राजूरकर यांच्या घरातून चोरट्यांनी ₹27,000 रोख रक्कम व मोबाईल चार्जर तर शुभम अशोक कोंगरे यांच्या होंडा युनिकॉर्न (क्र. MH-33-AB-6618) मोटारसायकलची नंबर प्लेटही चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले.
सलग चोरीच्या घटनांमुळे वणीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून चोरटे पोलिसांच्या हाती लागत नसल्याने चिंता निर्माण झाली आहे. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.
No comments: