Latest News

Latest News
Loading...

वणी ग्रामीण रुग्णालयातील सेवांचा बोजवारा – ट्रामा केअर सेंटरकडे जाण्यासाठी ‘चिखलयात्रा’

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी ग्रामीण रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागासह अनेक सेवा नव्या ट्रामा केअर सेंटरमध्ये हलवल्या असल्या तरी तिथे पोहोचण्यासाठीचा रस्ता तीन फूट पर्यंत पावसाच्या पाण्यात बुडून चिखलाने व्यापला आहे. आज गरोदर मातांच्या तपासणीच्या दिवशी अनेकांना या मार्गामुळे उपचाराविना परतावे लागले. औषधांचा तुटवडा, पक्क्या रस्त्याचा अभाव आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे रुग्णालयाची आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. संतप्त नागरिकांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

वणी ग्रामीण रुग्णालय हे सध्या रुग्णांसाठी उपचाराचे केंद्र कमी आणि हालअपेष्टांचे ठिकाण जास्त बनले आहे. आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव, औषधांचा तुटवडा आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे.

ग्रामीण रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागासह अनेक सेवा नव्याने उभारलेल्या ट्रामा केअर सेंटरमध्ये हलवण्यात आल्या आहेत. मात्र ही नवी इमारत जुन्या इमारती पासून २०० मीटर अंतरावर आहे. ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारत सुस्थितीत असतांनाही बऱ्याच रुग्णालयीन सेवा नव्या इमारतीत हलविण्यात आल्या आहेत. मात्र या नव्या इमारतीकडे जाण्यासाठी असलेला रस्ता तीन फूट पर्यंत पावसाच्या पाण्यात बुडालेला आणि चिखलाने व्यापला आहे. त्यामुळे रुग्णांना तपासणीसाठी जाणे म्हणजे अक्षरशः ‘चिखलयात्रा’ पार करण्यासारखे झाले आहे.

आज (१३ ऑगस्ट) गरोदर मातांच्या तपासणीचा दिवस असल्याने अनेक महिला तपासणीसाठी आल्या होत्या. परंतु पाण्याचे तळे व चिखलामुळे ट्रामा केअर सेंटरपर्यंत पोहोचणे कठीण ठरले. त्यामुळे अनेकांना उपचाराविना परतावे लागले.

ग्रामीण रुग्णालयाला अद्याप उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळालेला नाही. त्यात गंभीर आजारावरील औषधे व लसींचा नेहमीच तुटवडा राहत असल्याने हे रुग्णालय केवळ रुग्णांना पुढे रेफर करण्याचे ठिकाण बनले आहे. दोन इमारतींमध्ये केवळ २०० मीटर अंतर असले तरी त्या मार्गावर पक्क्या रस्त्याचा अभाव ही मोठी समस्या ठरली आहे.

स्थानिक नागरिकांचा संताप उफाळून आला असून, प्रशासनाने तातडीने पक्का रस्ता व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

No comments:

Powered by Blogger.