प्रशांत चंदनखेडे वणी :-
वणी विधानसभा क्षेत्र खनिज उत्खननामुळे गंभीरपणे बाधित असून, खनिज विकास निधीचे वाटप फक्त अधिकृतपणे नोंद असलेल्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष बाधित गावांनाच करावे, अन्यत्र निधी देणे तत्काळ थांबवावे, अशी ठाम मागणी शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे केली आहे.
जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या व्यवस्थापकीय समितीच्या अध्यक्षांना पाठविलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले की, वणी व झरी-जामणी तालुक्यातील एकूण सुमारे ३०० गावे खनिज उत्खननामुळे बाधित आहेत, मात्र मागील काळात निधीचा मोठा हिस्सा बाधित क्षेत्राव्यतिरिक्त अन्य भागांमध्ये वाटप झाल्याचे आढळते.
खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या वणी उपविभागात मोठ्या प्रमाणावर खनिज व गौण खनिजाचे उत्खनन होत असून, शासनाला महसूल मिळत असतानाही स्थानिक बाधित गावांना निधी वाटपात दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोपही निखाडे यांनी केला.
निधी वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखावी व सर्व माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी करताना त्यांनी इशारा दिला की, ही चूक पुन्हा झाल्यास शिवसेना (उबाठा) कायदेशीर व लोकशाही मार्गाने आंदोलन छेडेल आणि त्याची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील.
No comments: