Latest News

Latest News
Loading...

रेल्वे उड्डाणपुलाच्या खांबावर चढून मनसेचे ‘अभिनव’ आंदोलन तीन तास वाहतूक ठप्प, प्रशासनाला दोन महिन्यांची मुद्दत – अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा


प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी शहरातील रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम अतिशय संथ गतीने सुरु असल्याने या मार्गाने मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मागील दोन वर्षांपासून उड्डाणपुलाचे बांधकाम सुरु असून अत्यंत कासवगतीने बांधकाम केले जात असल्याने या मार्गाने मार्गक्रमण करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड हाल सोसावे लागत आहे. उड्डाणपुलाच्या सुरु असलेल्या बांधकामामुळे रस्त्याची अवस्था अत्यंत गंभीर झाली आहे. वाहनधारकांना वाहने चालवितांना मोठी कसरत करावी लागत आहे. हा मार्ग पूर्णतः चिखलमय झाला असून दुचाकी वाहनांचे अपघात येथे नित्याचेच झाले आहेत. 

उड्डाणपुलाचे बांधकाम करतांना आधी पर्यायी रस्ता तयार करणे गरजेचे असतांना कंत्राटदाराने त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. परिणामी या रस्त्याने वाहने चालविणे कठीण झाले असून वाहन चालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहे. उड्डाणपुलाजवळून वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता बांधून देण्याची मागणी मनसेकडून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र कंत्राटदार कंपनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग पासून काही अंतरापर्यंतचा रस्ता वाहतुकीयोग्य राहिलेला नाही. त्यामुळे वाहने चालवितांना वाहनधारकांचे प्रचंड हाल होत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज (दि. १४ ऑगस्ट) थेट रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन छेडले. चिखलगाव रेल्वे गेटवरील ३० फूट उंचीच्या निर्माणाधीन खांबावर चढून मनसे सैनिकांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला. या नाट्यमय आंदोलनामुळे शहरातील वाहतूक तब्बल तीन तास ठप्प राहिली.

रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात संताप

चिखलगाव रेल्वे गेट आणि संविधान चौकातील उड्डाणपुलांच्या सुरू असलेल्या कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पर्यायी मार्गांची (सर्व्हिस रोड) योग्य सोय नसल्याने कोंडी, चिखल, धूळ व अपघातांचा धोका वाढला आहे. मनसेने यापूर्वी प्रशासनापुढे ही समस्या मांडूनही दखल न घेतल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी ‘अभिनव’ आंदोलनाचा मार्ग अवलंबला.

खांबावर चढून घोषणाबाजी

तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार आणि शहराध्यक्ष अंकुश बोढे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी मुकुटबन व यवतमाळ रस्ता अडवून घोषणाबाजी केली. काही कार्यकर्ते थेट पुलाच्या खांबावर चढले. पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आंदोलकांना खाली उतरवून ताब्यात घेतले.

प्रशासनाची हमी – दोन महिन्यांत काम पूर्ण

वाहतूक ठप्प झाल्याने पोलिसांनी मनसे नेते राजू उंबरकर यांच्याशी चर्चा करून बांधकाम कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पोलिस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर, रेल्वे निरीक्षक बलवीर सिंह, कंपनीचे अभियंता हर्षित कुमार यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. यात दोन महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. आश्वासनांची पूर्तता न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेने दिला.

पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती

आंदोलनात मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान, तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहराध्यक्ष अंकुश बोढे, रुपेश ढोके, विलन बोदाडकर, परशुराम खंडाळकर, महेश हातगावकर, विठ्ठल बोथाडे, शंकर पिंपळकर, मयुर घाटोळे, धीरज पिदूरकर, प्रविण कळसकर, कैलास निखाडे, प्रदीप बदखल, गुड्डू वैद्य यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

मनसेचे राज्य नेते राजू उंबरकर यांनी कंपणीच्या इंजिनियरला धरले धारेवर
 

मनसे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग जवळ तीव्र आंदोलन करण्यात आले. रस्ता रोको करण्याबरोबरच रेल्वे रोखण्याचाही प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी आंदोलनस्थळी पोहचून आंदोलनकर्त्यांना स्थानबद्ध केले. त्यानंतर राजू उंबरकर यांच्यासह मनसे सैनिकांनी पोलिस स्टेशनमध्येच ठिय्या धरला. यावेळी उड्डाणपूल बांधकाम कंपनीच्या इंजिनियरला पोलिस स्टेशनमध्ये बोलाविण्यात आले. तसेच रेल्वे पोलिस व रेल्वेचे अधिकारीही पोलिस स्टेशनमध्ये हजर झाले. यावेळी बांधकाम कंपनीच्या इंजिनियरला राजू उंबरकर यांनी चांगलेच खडसावले. त्याला उड्डाणपुलाच्या संथगतीने सुरु असलेल्या बांधकामाबाबत धारेवर धरतांनाच रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेवर सरबत्ती दिली. उड्डाणपुलाजवळून वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता तयार करून देण्यात न आल्याने राजू उंबरकर यांनी  इंजिनियरला आपल्या शैलीत खडेबोल सुनावले. लवकरात लवकर वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता तयार करून न दिल्यास याही पेक्षा मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. राजू उंबरकर यांचा रुद्रावतार पाहून उड्डाणपूल बांधकाम कंपनीच्या इंजिनियरने शक्य होईल तेवढ्या लवकर वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता तयार करून देण्याचे मान्य केले.



No comments:

Powered by Blogger.