संकट, विवंचना व नैराश्येतून शेतकरी करू लागले आत्महत्या, स्वातंत्र्य दिनी दोन शेतकऱ्यांनी घेतला जगाचा निरोप
प्रशांत चंदनखेडे वणी :-
संकट, विवंचना व नैराश्येतून शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू लागले आहेत. नैराश्येच्या गर्तेत अडकलेले शेतकरी मृत्यूला कवटाळू लागल्याने चिंता वाढल्या आहेत. संकटाशी लढतांना निराशाच पदरी पडत असल्याने शेतकरी मृत्यूची वाट धरू लागले आहेत. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण प्रचंड वाढले असून वणी तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावरच विवंचनेतून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. वणी तालुक्यातील कळमना (बु) व नवरगाव (सैदाबाद) येथील दोन शेतकऱ्यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
सर्वत्र देशाच्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला जात असतांना तालुक्यातील या दोन शेतकऱ्यांनी मात्र विवंचनेतून विषारी द्रव्य प्राशन केले. स्वातंत्र्य दिनीच या दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. देशाला स्वातंत्र्य मिळून ७९ वर्ष झाले. पण शेतकऱ्यांची परिस्थिती मात्र आजही जैसे थेच आहे. कृषी प्रधान देशात जगाच्या पोशिंद्याला संकटांचा सामना करतांना जगाचा निरोप घ्यावा लागतो, यापेक्षा मोठं दुर्दैवं आणखी काय असू शकतं.
तालुक्यातील नवरगाव (सैदाबाद) येथील राजकुमार मारोती गोवारदीपे या शेतकऱ्याने राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना १५ ऑगस्टला सकाळी ८ वाजता उघडकीस आली. राजकुमारने विषारी द्रव्य प्राशन केल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ राजकुमार यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. त्यांच्या पश्च्यात मुलगा, सून व नातवंडे असा आप्त परिवार आहे.
दुसरी आत्महत्येची घटना तालुक्यातील कळमना (बु) येथे घडली. येथील सहदेव विश्वनाथ बोबडे यांनीही राहत्या घरीच विषारी द्रव्य प्राशन केले. ही घटना सुद्धा १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनीच सकाळी ६ वाजता उघडकीस आली. सहदेव यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविले. मात्र त्यांच्यावर उपचार सुरु असतांना रात्री ९ वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्याही आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र संकट व विवंचनेतून शेतकरी आत्महत्या करू लागल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याचं नाव पुढे येतं. पण शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन स्तरावर कुठल्याही प्रभावी उपाययोजना केल्या जात नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढतच चाललं आहे. आस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करतांना हताश झालेला शेतकरी शेवटी आत्महत्येचा पर्याय निवडू लागला आहे. पाषाण व्ह्रदयी राज्यकर्त्यांपर्यंत त्यांच्या वेदना पोहचत नसल्याने शेतकऱ्यांवर टोकाचे निर्णय घेण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या गांभीर्याने घेऊन त्या रोखण्यासाठी शासनाने योग्य त्या उपायोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
No comments: