Latest News

Latest News
Loading...

ढाकोरीची कन्या कालेश्वरी घोरपडे चमकली – यशाच्या आकाशात रोवला मानाचा झेंडा

प्रशांत चंदनखेडे वणी :-

प्रगतशील विचारसरणी व सामाजिक उपक्रमांसाठी वणी तालुक्यात ओळखले जाणारे ढाकोरी हे गाव आज अभिमानाने उजळून निघाले. गावातीलच कन्या कालेश्वरी घोरपडे हिने नुकत्याच पार पडलेल्या महादीप परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून विमानवारीसाठी पात्रता मिळवली. ढाकोरी गावातील जिल्हा परिषद शाळेची इयत्ता ८ वीची विद्यार्थिनी असलेल्या या तेजस्वी मुलीने आपल्या कर्तृत्वाने गावाचे नाव संपूर्ण जिल्ह्यात उंचावले आहे.

कालेश्वरीच्या या ऐतिहासिक यशाचा गौरव करण्यासाठी ग्रामपंचायत ढाकोरी तर्फे आज १५ ऑगस्टला भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सरपंच अजय कवरासे यांच्या हस्ते कालेश्वरीला मानाचा झेंडा देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी कालेश्वरीच्या यशाचे कौतुक करीत तिच्यावर फुलांची उधळण केली. अगदी कमी वयात कालेश्वरीने केलेल्या दैदिप्यमान कामगिरीमुळे तिच्या यशाच्या जयघोषांनी परिसर दुमदुमला होता.

ढाकोरीची प्रेरणादायी परंपरा

सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आगळे-वेगळे उपक्रम राबवणाऱ्या ढाकोरी ग्रामपंचायतीने याआधी विधवा महिलांचा सन्मान आणि १०वी-१२वीत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना झेंडा वंदनाचा मान देण्याची परंपरा सुरु केली आहे. कालेश्वरीला मिळालेला हा मान त्या परंपरेचा एक अभिमानास्पद टप्पा ठरला आहे.

सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती

सन्मान सोहळ्यास पोलीस पाटील प्रभाकर कोहळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतीश मुसळे, मीनानाथ काकडे, शिक्षक बिडकर, माधुरी काळे, मीनाक्षी बेझलवार, तलाठी मुंडे, ग्रामसेवक औचित्य पोटे, पंकज मांडवकर, शंकर पायघन, संतोष आत्राम तसेच ग्रामस्थ, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावाच्या लेकीने वाढवला गावाचा अभिमान

सरपंच अजय कवरासे यांनी सांगितले, "कालेश्वरीसारख्या मेहनती व जिद्दी विद्यार्थिनीमुळे आपल्या गावाला नवे मानदंड मिळाले आहेत. ग्रामपंचायत तिच्या पुढील शिक्षणासाठी सदैव पाठबळ देईल."

ढाकोरीच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे. गावाच्या लाडक्या लेकीने खरोखरच यशाचा झेंडा फडकावला असून, तिने घेतलेली यशस्वी भरारी ही येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.


No comments:

Powered by Blogger.