प्रशांत चंदनखेडे वणी :-
आलिशान कारमधून दारूची होणारी अवैध वाहतूक पोलिसांनी रोखली. दारूची तस्करी करणाऱ्या दोन तस्करांवर पोलिसांनी कार्यवाही करून त्यांना ताब्यात घेतले. तसेच अर्टिगा कारसह दारूचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. ही धडक कार्यवाही १६ ऑगस्टला सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास वणी घुग्गुस मार्गावरील ब्राह्मणी फाटा येथे करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ६ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वणी घुग्गुस मार्गाने अर्टिगा कारमधून दारूची अवैध वाहतूक होणार असल्याची खात्रीदायक माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ब्राह्मणी फाटा येथे सापळा रचला. सांगितलेल्या वर्णनाच्या अर्टिगा कारकडे पोलिस बारीक लक्ष ठेऊन होते. दरम्यान ही कार ब्राह्मणी फाटा येथे पोहचताच पोलिसांनी त्या कारला थांबविले. कारची तपासणी केली असता पोलिसांना कारमध्ये विदेशी दारूचा मोठा साठा आढळून आला. वेगवेगळ्या कंपनीचे विदेशी दारूचे बॉक्स कारमध्ये भरून होते. पोलिसांनी दारूच्या परवान्याबाबत चालकाकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे अवैध विक्रीकरिता कारमधून दारूची वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी विदेशी दारूच्या साठ्यासह दोन दारू तस्करांना ताब्यात घेतले.
प्रविण शंकरराव मुन (५०) व विठ्ठल वासुदेव पोलशेट्टीवार (६०)अशी या पोलिसांनी अटक केलेल्या दारू तस्करांची नावे आहेत. या कारवाईत पोलिसांनी ८२ हजार ९८० रुपये किंमतीची वेगवेगळ्या कंपनीची विदेशी दारू आणि एक अर्टिगा कार (MH ३४ BF २१४०) किंमत ६ लाख रुपये असा एकूण ६ लाख ८२ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कार्यवाही एसडीपीओ सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गोपाल उंबरकर, डीबी पथक प्रमुख एपीआय धिरज गुल्हाने व डीबी पथकाने केली.
No comments: