शिवसेनेचे (उबाठा) तीव्र रस्ता रोको आंदोलन, शिरपूर–आबई फाटा रस्त्याच्या दुरुस्तीला वेग : ५ दिवस जड वाहतूक बंद
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शिरपूर ते आबई फाटा रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून या रस्त्याच्या दुरुस्तीकरणाकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत असल्याने शिवसेनेने (उबाठा) आक्रमक भूमिका घेत रविवार दि. १७ ऑगस्टला तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले. शिवसेनेकडून करण्यात आलेल्या या रस्ता रोको आंदोलनामुळे तब्बल चार तास वाहतूक बंद राहिली. रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने रस्त्यावर दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
आंदोलनाची आक्रमकता लक्षात घेता आमदार संजय देरकर हे तात्काळ आंदोलनस्थळी पोहचले. त्यांनी रस्त्याची अवस्था व आंदोलनकर्त्यांची मागणी समजून घेतली. तसेच आंदोलनकर्त्यांशी चर्चा करीत त्यांनी वेकोलि अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आंदोलनस्थळी बोलावून त्यांची चांगलीच कान उघाडणी केली. त्यानंतर १८ ते २३ ऑगस्ट या कालावधीत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याने आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेत रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून दिला. मात्र रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत या मार्गाने कोळशाची व अवजड वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला.शिरपूर ते आबई फाटा पर्यंतचा रस्ता पूर्णतः उखडला असून या रस्त्याने छोटी वाहने चालवितांना तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्याने प्रवास करणे अत्यंत धोकादायक झाल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीकरणाच्या मागणीला घेऊन शिवसेनेकडून (उबाठा) तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे वेकोलि अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले.
आंदोलनस्थळी आमदार संजय देरकर यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी तातडीने WCL, PWD व पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून नागरिकांच्या अडचणीवर चर्चा केली. या चर्चेतून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. १८ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट या कालावधीत रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू राहील. या दरम्यान कोळशाची व जड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद राहील. रस्ता दुरुस्ती ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला स्पष्ट आदेश देण्यात आले. तसेच आमदार संजय देरकर यांनी यावेळी ठाम भूमिका घेत सांगितले की, “रस्ता दुरुस्ती पूर्ण झाल्याशिवाय शिरपूर–आबई फाटा मार्गावरून कोळशाची वाहतूक सुरू होणार नाही.”
या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय निखाडे, तालुकाप्रमुख संतोष कुचनकर, तसेच लूकेश्वर बोबडे, तुळशीराम बोबडे, भारत डंभारे, राजेंद्र ईद्दे, दिवाकर कवरासे, गौतम सुराणा, विजय ठाकरे, कुंदन टोंगे, मंगेश पाचभाई यांच्यासह शिवसेना व युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नागरिकांनी रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून, रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची एकमुखी मागणी आंदोलनातून झाली.
No comments: