प्रशांत चंदनखेडे वणी
वणी शहरालगत असलेल्या प्रेम नगर झोपडपट्टी परिसरात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मोठी कारवाई करत पोलिसांनी एका महिलेला अटक केली असून, जबरदस्ती वेश्या व्यवसायात ढकललेल्या एका २२ वर्षीय तरुणीची सुटका करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव लक्ष्मी दिपचंद शिसोदिया (वय ४५) असे आहे. ही कार्यवाही शनिवार ९ ऑगस्टला रात्री ७ ते ८ वाजताच्या सुमारास करण्यात आल्याचे सांगण्यात येते. रात्री ११.०८ वाजता या प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मारेगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उमेश खुशालराव बेसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘फ्रीडम फर्म’ या स्वयंसेवी संस्थेकडून त्यांना माहिती मिळाली की लक्ष्मी शिसोदिया ही महिला प्रेम नगर झोपडपट्टी परिसरात देहविक्रीचा अड्डा चालविते. त्यामुळे या माहितीची खातरजमा करण्यासाठी एसडीपीओ यांच्या आदेशानुसार पोलिसांनी प्रेमनगर झोपडपट्टी परिसरात सापळा रचला.
कारवाईदरम्यान एका ३० वर्षीय पंटरला आरोपीकडे पाठवण्यात आले. ठरलेल्या संकेतानंतर पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून लक्ष्मी शिसोदिया हिला रंगेहात पकडले. अंगझडतीदरम्यान तिच्याकडे १०० आणि २०० रुपयांच्या नोटांसह एकूण ३०० रुपये मिळाले.
यावेळी घटनास्थळी एक २२ वर्षीय तरुणी आढळून आली. या पीडित तरुणीने चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासा करतांना सांगितले की, लक्ष्मी शिसोदिया हिने तिला धमकावून जबरदस्ती वेश्या व्यवसायात ढकलले.
या प्रकरणी लक्ष्मी शिसोदिया या आरोपी महिलेवर भारतीय दंड संहिता कलम १४३, १४४(२) व अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम ३, ४, ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक गोपाल उंबरकर करत आहेत.
या कारवाईमुळे शहरातील अनैतिक व्यापार रॅकेटवर पोलिसांचा धडक प्रहार झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
No comments: