प्रशांत चंदनखेडे वणी :-
वणी शहरात वेगवेगळ्या ठिकाणांहून हरवलेले मोबाईल शोधून काढण्यात वणी पोलीसांना मोठे यश मिळाले आहे. नागरिकांच्या तक्रारींच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनच्या सायबर विभागाने हाती घेतलेल्या काटेकोर तपासामुळे तब्बल 13 मोबाईल शोधण्यात यश आले असून, हे सर्व मोबाईल त्यांच्या मुळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत.
गेल्या काही महिन्यांत मोबाईल हरविल्याबाबत अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात नोंद झाल्या होत्या. या सर्व तक्रारींची गांभीर्याने दखल घेत महिला पोलीस अंमलदार छाया उंमरे यांनी CEIR पोर्टलचा वापर करून तांत्रिक तपासाची दिशा ठरवली. चिकाटी, कौशल्य आणि तांत्रिक दक्षतेच्या जोरावर त्यांनी हरवलेले मोबाईल एकामागून एक शोधून काढत एकूण 13 मोबाईल हस्तगत करण्यात मोठे यश मिळवले.
ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या याच्या मार्गदर्शनाखाली सायबर विभागाच्या महिला अंमलदार छाया उंमरे यांनी कौशल्यपूर्ण तपास करून ही विशेष कार्यवाही केली. गुरुवार, दिनांक 18 सप्टेंबर रोजी वणी पोलीस ठाण्यात मूळ मालकांना बोलावून त्यांना हरविलेले मोबाईल परत करण्यात आले. मोबाईल मालकांनी आपल्या वस्तू सुरक्षितपणे परत मिळाल्याने आनंद व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले.
ही कारवाई वणी पोलिसांच्या तपासकौशल्याची आणि तांत्रिक प्रगतीचा योग्य वापर करून नागरिकांचा विश्वास जपण्याची जिवंत उदाहरण ठरली आहे. हरवलेली मालमत्ता शोधण्यात व परत करण्यात वणी पोलीस ठाण्याने केलेल्या या जबरदस्त कामगिरीचे शहरात कौतुक होत आहे.
No comments: