अनियमित पाणीपुरवठ्यावरून महिलांनी घेतली मनसेकडे धाव; आणि राजू उंबरकर यांनी न.प. प्रशासनाला धरले धारेवर
शहरातील महाराष्ट्र बँक रोड व अण्णाभाऊ साठे चौक परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठ्याचा मोठा फटका बसत असून, महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या महिलांनी अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्या शिवमुद्रा जनसंपर्क कार्यालयात धाव घेऊन आपली व्यथा मांडली.
महिलांनी स्पष्ट तक्रार केली की, “नगर परिषदेकडून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने आम्हाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी दरवेळी दूरवर जावे लागते, यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.”
या तक्रारीची गंभीर दखल घेत मनसे नेते राजू उंबरकर यांनी तत्काळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी व पाणीपुरवठा ठेकेदाराशी संपर्क साधला. “शहरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणे ही लाजिरवाणी बाब आहे. तेंव्हा जनतेच्या संयमाचा अंत न पाहता पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करा,” असा निर्वाणीचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
न.प. मुख्याधिकारी यांनी तांत्रिक अडचणींमुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे मान्य करत गुरुवारपासून नियमित पाणीपुरवठा सुरू होईल, असे आश्वासन दिले.
यावेळी मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👉 मनसेच्या हस्तक्षेपानंतर नगर परिषदेने दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरते का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
No comments: