प्रशांत चंदनखेडे वणी :-
वणी तालुक्यातील वेकोलिच्या भालर वसाहतीत परत एकदा धाडसी घरफोडीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोंडा तोडून सोन्या–चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण २ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना १७ सप्टेंबर सकाळी १० वाजता ते १८ सप्टेंबर रात्री १.३० वाजता दरम्यान घडली. याबाबत शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
वेकोलिच्या भालर वसाहत एम.क्यू. ३५० मध्ये राहणाऱ्या नलिनी शशिकांत ढाक (वय ३८) यांचे पती शशिकांत ढाक हे वेकोलि कर्मचारी आहेत. १६ सप्टेंबरला सकाळी १०.३० वाजता नलिनी आणि त्यांचे पती शशिकांत हे नागपूर येथे उपचारासाठी भरती असलेल्या सासऱ्यांना भेटण्यासाठी गेले होते. दरम्यान घरी सासू शोभा ढाक, मुलगा केतन आणि मुलगी कृष्णाली हे होते. मात्र १७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या सासऱ्यांचे निधन झाल्याने सासू, मुलगा आणि मुलगी हे देखील अंत्यविधीसाठी धानोरा (जि. चंद्रपूर) येथे गेले.
या काळात घराला कुलूप लागले असल्याची संधी साधून चोरट्यांनी बंद घराला टार्गेट केले. चोरट्यांनी घराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट फोडून त्यातील सामान अस्ताव्यस्त फेकले आणि लॉकरमधील ऐवज चोरून नेला. १८ सप्टेंबरला रात्री १.३० वाजता शेजाऱ्यांनी नलिनी यांना फोन करून त्यांच्या घराचा कडीकोंडा तुटलेला असून चोरट्यांनी त्यांच्या घरी चोरी केल्याची माहिती दिली. त्यामुळे नलिनी व त्यांचे पती रात्री २.३० वाजता भालर वसाहत येथे पोहचले. त्यांनी घरात जाऊन बघतले असता त्यांना घरातील सर्व सामान विखुरलेले दिसले. लोखंडी कपाटाचे दार उघडे होते तर लॉकर मधील सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास झालेली दिसली.
चोरट्यांनी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेऊन असलेली लांब सोन्याची पोत (30 ग्रॅम, किंमत 90,000 रु.), लहान पोत (10 ग्रॅम, किंमत 30,000 रु.), दोन सोन्याचे गोफ (एक 5 ग्रॅम किंमत 15,000 रु., दुसरा 7 ग्रॅम किंमत 21,000 रु.), सोन्याचे पदक (3 ग्रॅम, किंमत 9,000 रु.), सोन्याची अंगठी (5 ग्रॅम, किंमत 15,000 रु.), सोन्याचे नथ मुखडे (2 ग्रॅम, किंमत 6,000 रु.), सोन्याचे टॉप्स/झुमके (5 ग्रॅम, किंमत 15,000 रु.), चांदीची चैन (10 ग्रॅम, किंमत 2,000 रु.) व रोख 50,000 रुपये असा एकूण 2,53,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
दरम्यान, भालर कॉलनीतील सुरक्षा रक्षक अंकीत गिरधारीलाल शर्मा यांनी चोरट्यांना पळताना पाहिले असल्याचे नलिनी यांना सांगितले. चोरटे समोर आल्यास ते त्यांना ओळखू शकतील, असेही या सुरक्षा रक्षकाने त्यांना सांगितले.
अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातील ऐवज लंपास केल्याने नलिनी ढाक यांनी १८ सप्टेंबर रोजी शिरपूर पोलीस स्टेशनला धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध बीएनएसच्या कलम 305(a) आणि 331(4) अन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. भालर वसाहतीत सतत घरफोडीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
No comments: