प्रशांत चंदनखेडे वणी :-
गवंडी कामाची मजुरी मागणाऱ्या मजुराला शिवीगाळ करीत काठीने त्याचे डोके फोडल्याची घटना १७ सप्टेंबरला सकाळी १०.३० वाजता मारेगाव तालुक्यातील मांगरूळ या गावात घडली. याबाबत पोलीस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मांगरूळ येथे राहणाऱ्या अविनाश शंकर तुरनकर (२७) याला गावातीलच गजानन मनोहर गोडे (४८) याने शिवीगाळ करीत काठीने मारून त्याचे डोके फोडले. अविनाश हा गवंडी काम करतो. एक महिन्यापूर्वी त्याने गजानन गोडे याच्याकडे गवंडी काम केले होते. मात्र गजानन गोडे अविनाश याला गवंडी कामाची मजुरी देण्यास टाळाटाळ करीत होता.
अशातच १७ सप्टेंबरला अविनाश हा गावातील रस्त्याच्या बाजूला असलेल्या ओट्यावर बसून असतांना गजानन गोडे हा तेथे आला. तेंव्हा अविनाशने त्याला गवंडी कामाची मजुरी मागितली. त्यावर गजानन हा चांगलाच भडकला. आठ दिवसांनी पैसे देतो असे म्हणत तो अविनाशला शिवीगाळ करू लागला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने घरून काठी आणून अविनाशच्या डोक्यावर मारली. त्यामुळे त्याचे डोके फुटून तो जखमी झाला. आरोपी गजानन याने अविनाशला जीवे मारण्याची देखील धमकी दिली.
अविनाशने झालेल्या मारहाणीबाबत पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलीसांनी गजानन गोडे याच्यावर बीएनएसच्या कलम ११८(१), ३५१(२)(३), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
No comments: