Latest News

Latest News
Loading...

**वणीमध्ये शिवसेना (उ.बा.ठा.) महिला आघाडीचा पाकिस्तानविरोधी संताप; “माझं कुंकू – माझा देश”च्या घोषणांनी चौक दणाणला

प्रशांत चंदनखेडे वणी :-

भारत–पाकिस्तान क्रिकेट सामना खेळविण्याचा निर्णय जाहीर होताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीने वणी शहरात तीव्र आंदोलन छेडत पाकिस्तानविरोधी संताप व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेकडो महिला एकवटल्या आणि *“माझं कुंकू – माझा देश”*च्या जोरदार घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

या आंदोलनाचे नेतृत्व आमदार पत्नी व सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा किरणताई देरकर व शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख योगिता मोहोड यांनी केले. आंदोलनादरम्यान महिलांनी “पाकिस्तान मुर्दाबाद”, “जय शाह हाय हाय” अशा घोषणांनी वातावरण तापवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १०२० कुंकवाच्या डब्या पाठवून महिलांनी प्रतीकात्मक निषेधही व्यक्त केला.

एवढेच नाही तर किरणताई देरकर यांनी भारत पाकिस्तान क्रिकेट सामना खेळविण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध टोकाचा संताप व्यक्त करीत शिवाजी महाराज चौकात प्रतीकात्मक टीव्ही फोडला. तर महिलांनी क्रिकेट सामन्याचे प्रतीक म्हणून बॅट, बॉल आणि स्टम्प जाळत पाकिस्तानविरोधात तीव्र रोष नोंदवला.

यावेळी महिला आघाडीच्या नेत्या म्हणाल्या, “पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा थेट हात असतांनाही भारत सरकारने भारत पाक क्रिकेट सामना खेळविण्याचा संतापजनक निर्णय घेतला. पाकिस्तान दहशतवादी हल्ल्यांचा मुख्य सूत्रधार असतांना देखील भारत–पाक क्रिकेट सामना खेळविण्याचा निर्णय घेणे म्हणजे शहीद जवानांच्या कुटुंबांचा अपमान करण्यासारखे आहे. सरकारने या बहिणींच्या भावनांचा छळ केला असून याची किंमत त्यांना चुकवावी लागेल.”

या आंदोलनामुळे वणी शहरात पाकिस्तानविरोधी संतापाची लाट उसळली होती. तर महिलांच्या सरकारविरोधी घोषणाबाजीने चौकातील वातावरण तापले होते.

या आंदोलनात शिवसेनेच्या महिला उपजिल्हा संघटिका डिमन टोंगे, सरपंच गीता उपरे, इंदु किन्हेकर, सरपंच रूपाली कातकडे, सुरेखा ढेंगळे, सुरेखा भोयर, पौर्णिमा राजुरकर, सविता आवारी, सुनंदा गुहे, शारदा चिंतकुंतलवार, रेखा बोबड़े, अर्चना पिदुरकर, पौर्णिमा भोंगळे, जिजा वरारकर, अरुणा कूचनकार, अमीना पठाण, यमुना हिरादेवर, रजनी टोंगे, किर्ती देशकर, संध्या कोकास, प्रगती घोटेकर, शुभांगी ठाकरे, मनिषा टोंगे, विद्या कालेकर, मीनाक्षी मोहिते, माधुरी सुंकूरवार, रेश्मा कातरकर, शुभांगी टोंगे, प्रभाताई खाडे, शालिनी देरकर, मीनाक्षी गायकवाड, सुजाता ठाकरे, विशाखा चौधरी, उषा सुर, भाग्यश्री जुनगरी, मनिषा बोबडे, सविता दोडके यांच्यासह वणी-झरी-मारेगाव तालुक्यातील शेकडो महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.

🔸 शिवसेना महिला आघाडीच्या या आंदोलनाने वणी शहरात पाकिस्तानविरोधी भावना तीव्रतेने उफाळून आल्या.


No comments:

Powered by Blogger.