प्रशांत चंदनखेडे वणी :-
युवकाच्या दारूच्या बिलावरून झालेल्या वादाचा वचपा काढण्याकरिता सात ते आठ महिलांचा झुंड बियरबारवर चालून आला. या महिलांच्या टोळक्याने बियरबारवर हल्लाबोल करीत बार मालक व मॅनेजरला जबर मारहाण केली. या टोळक्याने बियरबारमध्ये प्रचंड धिंगाणा घातला. बार मालकाच्या डोळ्यात मिरची पावडर झोकून त्याला जखमी करण्यात आले. ही घटना वणी वरोरा मार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ असलेल्या न्यू ज्योती बियरबारमध्ये शनिवार दि. १३ सप्टेंबरला दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. याबाबत पोलीस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी बियरबारवर हल्ला चढविणाऱ्या महिला आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहिती नुसार, वणी तालुक्यातील राजूर (कॉ.) येथे राहणारा शेखर अशोक दुर्गमवार (३०) हा १२ सप्टेंबरला सायंकाळी न्यू ज्योती बियरबारमध्ये दारूची तलब भागविण्याकरिता आला होता. दारू पिल्यानंतर तो बिलाचे पैसे न देताच बियरबार मधून जाऊ लागला. मात्र बार मालक मनोज उरकुडे याने त्याला बिलाचे पैसे देण्यास सांगितले. यावरून शेखर दुर्गमवार हा चांगलाच भडकला. त्याने बार मालकांशी हुज्जत घालणे सुरु केले. परंतु बार मालकाने दारूच्या बिलाचे पैसे चुकते करायचे आणि निघायचे असे म्हटल्यानंतर त्याच्या नातेवाईकाने बिलाचे पैसे चुकविले. मात्र शेखरने बार मधून बाहेर पडतांना बार मालक मनोज उरकुडे यांना 'उद्या तुला दाखवितो' असा सज्जड दम दिला.
दुसऱ्या दिवशी राजूर (कॉ.) येथील ७ ते ८ महिलांचा झुंड न्यू ज्योती बियरबारवर चालून आला. या महिला सरळ बारमध्ये घुसल्या. त्यांच्या हातात प्लॅस्टिक पाईप व लाकडी दांडे होते. या महिलांनी बियरबारमध्ये प्रचंड धिंगाणा घातला. बार मालकाला अश्लील शिवीगाळ करीत त्याच्या डोळ्यात मिरची पावडर झोकली. त्यामुळे बार मालकाला काही क्षण डोळे उघडणे कठीण झाले. मिरची पावडर झोकल्याने त्याच्या डोळ्यात अंगार होऊ लागली. त्यानंतर या महिलांच्या टोळक्याने बार मालकाला प्लॅस्टिक पाईप व लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. तसेच बार मॅनेजर आशिष खाडे याला देखील काचेचा ग्लास फेकून मारला. त्यामुळे तो जखमी झाला. या महिलांनी बियरबारमध्ये प्रचंड धुडगूस घातला. चित्रपटातील दृश्याप्रमाणे बार मालक व कर्मचारी युवकाला मारहाण केली.
शेखर दुर्गमवार याने बिलाच्या पैशावरून झालेल्या वादाचा वचपा काढण्याकरिता या महिलांना पाठविल्याचे मनोज उरकुडे यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी ही माहिती पोलिसांना देत झालेल्या मारहाणीबाबत पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. मनोज रामराव उरकुडे (४१) यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी महिलांवर बीएनएसच्या कलम १८९(२), १९१(२), १९०, १८०(१), ११५(२), २९६, ३५१(२)(३) नुसार गुन्हा दाखल केला आहे. बियरबारवर महिलांच्या टोळक्याने अटॅक केल्याने गुन्हेगारी क्षेत्रात अलीकडच्या काळात असे पहिल्यांदाच पाहायला मिळाल्याच्या जोरदार चर्चा शहरात रंगल्या होत्या. घटनेचा पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.
No comments: