प्रशांत चंदनखेडे वणी :-
ग्रामीण भागातील पंचायत राज संस्थांना सक्षम आणि कार्यक्षम बनविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” राबविण्यात येत असून, या अभियानाच्या व्यापक प्रसिद्धीसाठी वणी पंचायत समितीतर्फे तालुका स्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
ही कार्यशाळा दिनांक १२ सप्टेंबर रोजी वरोरा रोडवरील एस. बी. हॉल येथे आमदार संजय देरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या कार्यशाळेला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेले वणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार यांनी अभियानाविषयी सविस्तर माहिती सादर केली व PPT च्या माध्यमातून मार्गदर्शन केले. तसेच तहसीलदार वणी यांनी “सेवा पंधरवडा” या उपक्रमाची माहिती देत ग्रामपंचायत स्तरावर जनतेला अधिक सुलभ सेवा देण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने योगदान द्यावे, असे आवाहन केले.
यावेळी कार्यशाळेतील उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार संजय देरकर यांनी तालुक्यातील ज्या ग्रामपंचायती या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करतील, त्यांना आपल्या वैयक्तिक निधीतून पारितोषिक देण्याची घोषणा केली. यामुळे ग्रामपंचायतींमध्ये कार्यक्षमतेसाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण होण्यास चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक व संचालनाची धुरा ग्रामविस्तार अधिकारी बी. एन. जाधव यांनी सांभाळली. या कार्यशाळेला तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी-कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक, संगणक परिचालक तसेच विविध शासकीय कार्यालय प्रमुखांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून ग्रामीण विकासाला नवी दिशा देण्यासाठी “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” तालुका स्तरावर जोमाने पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
No comments: