दीपक चौपाटी रस्त्याची दुरवस्था, नागरिकांचा संयम सुटला आणि नागरिक थेट रस्त्यावर उतरले, केले रस्ता रोको आंदोलन
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरातील दीपक चौपाटी पासून गोकुळनगरकडे जाणारा रस्ता पूर्णतः खड्ड्यांनी व्यापला असून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग सातत्याने डोळेझाक करीत असल्याने येथील नागरिकांच्या संयमाचा उद्रेक झाला. नागरिकांनी रस्त्यावर उतरून आरटीआय कार्यकर्ते दादाजी पोटे यांच्या नेतृत्वात आज १५ सप्टेंबरला थेट रस्ता रोको आंदोलन करीत या मार्गावरील वाहतूक रोखून धरली. त्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली. बांधकाम विभागाविषयी नागरिकांमधून प्रचंड रोष व्यक्त होतांना दिसला. रस्त्याची प्रचंड दुरवस्था होऊनही रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नागरिकांचा संयम सुटला आणि नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला.
दीपक चौपाटी ते गोकुळनगरकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. एवढेच काय तर खड्ड्यांमुळे या रस्त्याची पूर्णतः चाळणी झाली आहे. पावसाच्या पाण्याने रस्त्यावरील खड्डे तुडुंब भरल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने या रस्त्यावर छोट्या वाहनांचे अपघात नित्याचेच झाले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज घेत वाहने चालवितांना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने हा रस्ता रहदारीयोग्य राहिलेला नसतांनाही बांधकाम विभाग या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे सौजन्य दाखवायला तयार नाही.
दीपक चौपाटी ते गोकुळनगरकडे जाणाऱ्या रस्त्याची झालेली दुरवस्था आणि या रस्त्याच्या दुरुस्तीकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे येथील नागरिकांमध्ये खदखदत असलेला असंतोष आज उफाळून आला. नागरिक थेट रस्त्यावर उतरले आणि या रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली. रस्त्याच्या बांधकामाला विलंब होत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत प्रशासनाविषयी रोष व्यक्त केला. या रस्त्याच्या दुरुस्तीची सातत्याने मागणी सुरु असतांना बांधकाम विभाग मात्र याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नसल्याने नागरिकांचा संयम सुटला आणि नागरिकांनी रस्त्यावर उतरून आरटीआय कार्यकर्ते दादाजी पोटे यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली. या रस्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
No comments: