Latest News

Latest News
Loading...

“ओला दुष्काळ तातडीने जाहीर करा; अन्यथा शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरेल” – संजय खाडे

प्रशांत चंदनखेडे वणी :-

सलग दोन महिन्यांच्या अतीवृष्टीने वणी उपविभागातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली जाऊन शेतकरी उध्वस्त झाला आहे. वर्धा व पैनगंगा नदीला आलेल्या प्रचंड पुराने शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला असून आस्मानी संकटाने शेतकरी आर्थिक संकटात आला आहे. अतिवृष्टीने शेती पूर्णतः जलमय झाली असून नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. मात्र शासनाकडून अजूनही ठोस मदत जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आज आक्रमक पवित्रा घेत तहसील कार्यालयावर धडक देत “ओला दुष्काळ तातडीने जाहीर करा” अशी ठाम मागणी केली.

काँगेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री यांना उद्देशून उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर केले. यावेळी शासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत काँग्रेसने सरकारला इशारा दिला की, “शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आम्ही रस्त्यावर उतरू, वेळ पडल्यास जनआंदोलनही पेटवू.”

🌧️ शेतकऱ्यांची बिकट अवस्था

ऑगस्टमध्ये पैनगंगेच्या पुरामुळे झरी व वणी तालुक्यातील शेतशिवार पाण्याखाली गेले होते. त्यानंतर सप्टेंबरमध्ये वर्धा नदीला आलेल्या पुराने नांदेपेरा, शेलू, रांगणा, भुरकी, गोवारी, कोलेरा, पिंपळगाव, जुनी उकणी, निलजई, बेलोरा या गावातील पिके पूर्णतः जलमय झाली. सलग दोन महिन्यांच्या या आपत्तीने शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे.

💡 काँग्रेसच्या मागण्या

वणी उपविभागात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना एकरी ५० हजारांचे अनुदान द्यावे, सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, पीकविम्याचा मोबदला त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, सीसीआय कापूस नोंदणीची मुदत वाढवावी आदी मागण्यांचा समावेश आहे.

⚠️ संजय खाडेंचा इशारा

संजय खाडे म्हणाले, “शेतकऱ्यांचे हाल पाहूनही शासनाने मौन धारण केले आहे. ही उदासीनता आम्ही सहन करणार नाही. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून मदत केली नाही, तर काँग्रेस शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरेल आणि जनआक्रोश आंदोलन उभारेल.”

या आंदोलनात पुरुषोत्तम आवारी, अशोक चिकटे, तेजराज बोढे, डॉ. शंकर वहाटे, उत्तम गेडाम, विकेश पानघटे, प्रमोद लोणारे, देवराव देऊळकर, दिनेश पाहूनकर, उषा काटोके, विनित तोडकर, पुंडलीक गुंजेकर, संदीप कांबळे, प्रफुल्ल वाळके, नरेंद्र चिकटे, महादेव तुराणकर, सुधीर खंडारकर, संजय शेंडे यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.


No comments:

Powered by Blogger.