बांधकाम कामगारांसाठी तालुकास्तरीय वस्तू वाटप केंद्राची मनसेची जोरदार मागणी; अन्यथा... राजू उंबरकरांचा प्रशासनाला इशारा
प्रशांत चंदनखेडे वणी :-
बांधकाम कामगारांच्या हक्कांवर पाणी फेरणाऱ्या प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून गृहउपयोगी वस्तूंचे वाटप सध्या फक्त सेलू (ता. पुसद) येथूनच होत असल्याने संपूर्ण जिल्ह्यातील हजारो कामगार अक्षरशः धावपळ, आर्थिक कसरत आणि हालअपेष्टा सहन करत आहेत. या अन्यायकारक व्यवस्थेविरोधात मनसे नेते राजू उंबरकर यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला असून, “प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी केंद्र सुरू झाले नाही, तर मनसे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल” असा अल्टीमेटम दिला आहे.
◼️ चांगली योजना, पण कामगारांसाठी त्रासदायक
कामगारांच्या कल्याणासाठी सुरू झालेल्या या योजनेतून ३० प्रकारच्या घरगुती वस्तू मिळतात. मात्र प्रत्यक्षात कामगारांना हा लाभ घेण्यासाठी २५० ते ३०० किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. या प्रवासासाठी २ ते ३ हजार रुपयांचा खर्च तर होतोच, शिवाय कामाचा एक पूर्ण दिवस बुडत असल्याने कामगारांना दुहेरी फटका बसतो. गरीब कामगारांना हा खर्च परवडणारा नसल्याने अनेकजण या योजनेपासून वंचित राहत आहेत.
◼️ जिल्ह्यातील कामगारांची आर्थिक कुचंबणा
यवतमाळ जिल्हा भौगोलिकदृष्ट्या विस्तृत असल्याने उमरखेड, महागाव, आर्णी, कळंबसह इतर तालुक्यांतील कामगारांना वस्तू घेण्यासाठी सेलू गाठणे अत्यंत खर्चिक ठरत आहे. “सरकारने योजना केली पण प्रशासनाच्या बेफिकीरीमुळे कामगारांचे जीवन कोंडीत सापडले आहे. प्रवासाचा खर्च, कामाचा दिवस बुडणे आणि आर्थिक नुकसान या तिहेरी संकटात कामगार भरडले जात आहेत”, असे राजू उंबरकरांनी प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले.
◼️ मनसेचा अल्टीमेटम
मनसे नेते राजू उंबरकर यांनी जिल्हा कामगार अधिकारी आणि मंडळाच्या अध्यक्षांना निवेदन देत “प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वस्तू वाटप केंद्र सुरू करा, अन्यथा येत्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगारांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरेल” असा इशारा दिला आहे. कामगारांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नाकडे प्रशासनाने खेळ म्हणून पाहू नये, अन्यथा मनसेची झंझावाती भूमिका संपूर्ण जिल्हा अनुभवेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
👉 गरीब बांधकाम कामगारांच्या उदरनिर्वाहाशी संबंधित या गंभीर प्रश्नावर प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर येत्या काळात यवतमाळ जिल्ह्यात मनसेचे आंदोलन पेट घेईल, हे निश्चित दिसत आहे.
No comments: