Latest News

Latest News
Loading...

झोला घाटावरील रेती तस्करी प्रकरण : मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर न्यायालयामार्फत गुन्हे दाखल करण्याची मागितली परवानगी


प्रशांत चंदनखेडे वणी :-

वणी तालुक्यातील झोला रेती घाटावर तहसीलदार निखिल धुळधर यांनी मध्यरात्री महसूल पथकासह धाड टाकून वर्धा नदीपात्रात बेकायदेशीरपणे रेतीचा उपसा व रेती चोरी करतांना आढळलेल्या वाहनांवर धडक कार्यवाही केली होती. त्यानंतर झोला रेती घाटावरून सर्रास रेतीची चोरी करणाऱ्या वाळू माफियांचा पर्दाफाश झाल्यानंतर त्यांच्यावर १ कोटी १४ लाख ८७ हजार ३१९ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. महसूल विभागाने झोला रेती घाटावरून एक पोकलँड मशीन व रेती भरलेला एक हायवा ट्रक जप्त केला होता. आणि रेती तस्करांवर कोट्यवधींचा दंडही ठोठावला होता. 

मात्र वर्धा नदीच्या झोला रेती घाटावर सर्रास रेतीचा उपसा व रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरु असतांना या बीटचे तलाठी व मंडळ अधिकारी यापासून अनभिज्ञ कसे, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. या जबाबदार अधिकाऱ्यांनी डोळ्यावर हितसंबंधांची पट्टी बांधली असल्याचा संशय व्यक्त होत असतांनाही त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. दरम्यान या दोन्ही अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात जिल्हा पोलिस प्रशासनाकडे लेखी तक्रार करूनही गुन्हे दाखल करण्यास असमर्थता दर्शविण्यात आल्याने त्यांच्यावर न्यायालयामार्फत गुन्हे दाखल करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या लेखी अर्जातून केली आहे. 

वर्धा नदीच्या झोला रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरु असल्याचे वृत्त माध्यमांवर झळकल्यानंतर तहसीलदार निखिल धुळधर यांनी त्याची गंभीर दखल घेत स्वतः महसूल पथकासह झोला रेती घाटावर जाऊन सापळा रचला. आणि वर्धा नदी पात्रातून बेकायदेशीरपणे रेतीचा उपसा व रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर धडक कार्यवाही करीत एक पोकलँड मशीन व एक हायवा ट्रक जप्त केला होता. ६ एप्रिलला मध्यरात्री ही कार्यवाही करण्यात आली होती. 

त्यानंतर वर्धा नदीच्या झोला घाटावरून एकूण किती ब्रास रेती चोरी झाली याची संबंधित विभागांकडून तपासणी करण्यात आली. संबंधित विभागाने दिलेल्या माहिती वरून ४३७.०३ ब्रास रेती चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर झोला रेती घाटावरून रेती तस्करी करणाऱ्या तस्करांची नावे पुढे आल्यानंतर महसूल विभागाने उमेश बोढेकर, मुरलीधर गेडाम व मतीन शेख अहेमद यांच्यावर १ कोटी १४ लाख ८७ हजार ३१९ रुपये एवढा दंड ठोठावला. या रेती तस्करांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली असली तरी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात न आल्याने प्रशासनावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. 

अशातच झोला बीटचे तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या धोरणांवरही टीकेची झोड उठली. अनेक दिवसांपासून झोला रेती घाटावर बेकायदेशीरपणे रेतीचा उपसा व रेतीची अवैध वाहतूक सुरु असतांना तलाठी व मंडळ अधिकारी यांना त्याचा जराही मागमूस लागू नये, याबाबत त्यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला. तसेच तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्याचीही राजकीय व सामाजिक क्षेत्रातून मागणी करण्यात आली. मात्र रेतीची सर्रास तस्करी सुरु असतांना डोळ्यावर काळा चष्मा लावलेल्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची प्रशासनाकडून पाठराखण करण्यात आली. परंतु तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या डोळेझाकपणामुळेच तस्करांचे फावले असल्याचा आरोप अजूनही त्यांच्यावर सुरूच असून आडे आणि झाडे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी आजही सामाजिक क्षेत्रातुन तेवढ्याच तीव्रतेने होत आहे. 

सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांनी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी जिल्हा पोलिस प्रशासनाकडे केली होती. मात्र जिल्हा पोलिस प्रशासनाने हा विषय महसूल विभागाशी संबंधित असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे रविंद्र कांबळे यांनी आता उपविभागीय अधिकारी यांना लेखी पत्र देत आडे व झाडे यांच्यावर न्यायालयामार्फत गुन्हे दाखल करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. रविंद्र कांबळे यांनी यापूर्वीही न्यायालयामार्फत नगर पालिका व ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे रविंद्र कांबळे यांच्या लेखी तक्रार अर्जावर काय कार्यवाही होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

No comments:

Powered by Blogger.