बोगस बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल करा; अन्यथा आमरण उपोषण – प्रहार तालुकाप्रमुख अनिकेत चामाटे यांचा इशारा
केळापूर (प्रतिनिधी) :-
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा बोगस बियाण्यांच्या फसवणुकीला बळी पडले आहेत. ऐन खरीप हंगामात नामांकित कंपन्यांच्या बियाण्यांची टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना पर्याय म्हणून बोगस बियाणे पुरवले जात असल्याचा आरोप होत आहे. याविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख अनिकेत चामाटे यांनी कृषी विभागाला धडक इशारा दिला आहे. "बोगस बियाणे उत्पादक व वितरकांवर गुन्हे दाखल न झाल्यास केळापूर कृषी विभाग कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल," असा इशारा त्यांनी निवेदनातून दिला.
सखी (वाढोना) येथील शेतकरी आकाश खोंडे यांची हिंगणघाट येथील यशोदा सीड्स कंपनीकडून मोठी फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. करंजी येथील जिजाऊ कृषी केंद्रामार्फत खरेदी केलेल्या “चमको” या कापूस बियाण्यांबाबत 140 ते 160 दिवसांत उत्तम उत्पादन देण्याचा दावा करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात 90 दिवस उलटूनही झाडांवर फक्त चार ते पाच फुलोरे असून बोंडच आलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
या प्रकरणी शेतकऱ्यांनी कंपनी व कृषी केंद्र चालकाकडे तक्रार केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. उलट कंपनीने कोणताही मोबदला देण्यास नकार दिला. यामुळे शेतकऱ्यांचा संताप अधिकच वाढला आहे.
प्रहारने पुढील मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी केली आहे –
अत्यावश्यक वस्तू कायदा 1955, बियाणे कायदा 1966, कीटकनाशके कायदा 1968 अन्वये वितरक व विक्रेत्यावर कारवाई करावी, कलम 420 सह जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम 3, 7, 9, 6, 135, 8(अ) नुसार गुन्हा दाखल करावा, बोगस बियाणे वितरित करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा नोंदवावा तसेच कापूस बियाणे अधिनियम 2009, वजन व मापे कायदा, कापूस किंमत कायदा 2015 अंतर्गत कठोर कारवाई करावी.
या मागण्या मान्य न झाल्यास केळापूर येथील कृषी विभागाच्या कार्यालयासमोर प्रहारतर्फे आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा तालुकाप्रमुख चामाटे यांनी दिला. या वेळी प्रहारचे उपजिल्हाप्रमुख मोबिन शेख व भोजराज रिंगोले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
👉 शेतकऱ्यांची फसवणूक थांबविण्यासाठी तातडीने कारवाई न झाल्यास परिस्थिती गंभीर होईल, असा कडक इशारा प्रहारने दिला आहे.
No comments: