Latest News

Latest News
Loading...

यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा : सरकारला जागे करण्यासाठी शिवसेनेचे (उबाठा) डफडे आंदोलन

प्रशांत चंदनखेडे वणी :-

निसर्ग कोपल्याने शेतकऱ्यांवर ओल्या दुष्काळाचं सावट पसरलं आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांची हिरवीगार स्वप्न करपली आहेत. घाम गाळून पिकवलेलं आणि कष्टातून उगवलेलं पिक धो-धो बरसणाऱ्या पावसात वाहून गेलं. निसर्गाच्या अवकृपेमुळे उभं पिक हातून गेल्याने शेतकऱ्यांवर आभाळ कोसळलं आहे. अतिवृष्टीमुळे शेत पिकांची प्रचंड हानी झाल्याने शेतकरी चिंतामग्न झाला आहे. निसर्ग वैरी झाला आणि पावसाने बंडखोरी केल्याने शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फेरलं गेलं. निसर्गाच्या क्रूरतेमुळे शेतकरी पुरता हादरला असून तो देशोधडीला आला आहे. शेतात डौलणारी पीकं शेतातच आडवी झाल्याने शेतकऱ्यांचं अवसान गळालं आहे. शेत जमीन अक्षरशः खरडून निघाली असून शेत पिकं पाण्यात बुडाली आहेत. 

शेतीतून होणाऱ्या उत्पन्नावर शेतकरी वर्षाभऱ्याचं नियोजन करतो, पण शेतातील उत्पनावरच निसर्गाचा कोप झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अतिवृष्टीने शेत पिकांचं अतोनात नुकसान झालं असतांनाही प्रशासनाकडून पंचनामे करण्यात दिरंगाई होत आहे. शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली असतांनाही शासनाकडून अद्याप आर्थिक मदत जाहीर झाली नाही. जगाच्या पोशिंद्यावर भयंकर परिस्थिती ओढावली असतांना सरकार मात्र कुंभकर्णी झोपेत आहे. त्यामुळे चिरनिद्रेत असलेल्या सरकारला झोपेतून जागे करून बळीराजाला न्याय देण्याकरिता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने २३ सप्टेंबरला दुपारी १ वाजता तहसील कार्यालयासमोर डफडे आंदोलन करण्यात येणार आहे. 

वणी उपविभागात अतिवृष्टी झाल्याने शेतातील पिकं जमीनदोस्त झाली आहेत. कष्टाने वाढविलेली पिकं पाण्यात बुडाल्याने शेतकरी प्रचंड विवंचनेत आला आहे. शेतीची मशागत व शेत पिकांच्या लागवडीवर केलेला खर्चही पूर्णतः पाण्यात बुडाला आहे. त्यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करतांना शेतकरी हवालदिल झाला आहे. कधी पावसाच्या प्रतीक्षेत आकाशाकडे टक लावून बसणारा शेतकरी आज पावसाच्या बंडखोरीने मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांशी नेहमी दगाफटका करणाऱ्या पावसाने यावेळीही शेतकऱ्यांचा घात केला आहे. धो-धो बरसणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं. शेतात तळे साचले. उभी पिकं लोळली. शेती अक्षरशः खरडून निघाली. 

यावर्षी निसर्गाचं विक्राळ रूप पाहायला मिळालं. पावसाने हाहाकार माजविला. नदी नाल्यांना प्रचंड पूर आला. शेतांनाही तळ्याचे स्वरूप आले. शेतातील उभी पिकं आडवी झाली. पुराच्या पाण्यात अख्ख पिक वाहून गेलं. लागवडीवर केलेला खर्चही पाण्यात बुडाला. निसर्ग वैऱ्यासारखा वागला. पण सरकार मात्र आपल्या दिमतीला राहील ही शेतकऱ्यांना आस लागली आहे. मात्र सरकारही डोळे बंद करून बसलं आहे. शेतकऱ्यांचा टाहो सरकारला ऐकू येत नाही कारण त्यांनी काळात बोळे भरले आहेत. प्रशासनाकडून शेत पिकांचे पंचनामे करण्यात दिरंगाई होत आहे. सरकारने अजूनही आर्थिक मदतीची घोषणा केलेली नाही. त्यामुळे कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांचीच कुचंबणा होत असल्याची वास्तविकता आता उघड होऊ लागली आहे. 

अतिवृष्टीने शेतकऱ्यांची प्रचंड वाताहत झाली आहे. शेतातील पिक नाहीसं झालं आहे. पावसाने कहर केल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेला पारावर उरलेला नाही. उभं पिक हातून गेल्याने शेतकरी चिंतासागरात बुडाला आहे. मात्र शेतकऱ्यांची झालेली परवड आणि दैना शासनाला दिसू नये, याचेच नवल वाटते. नैसर्गिक आपत्तीने कष्टाने पिकविलेल्या शेतीची पार वाट लागली आहे. शेतकऱ्यांचं आर्थिक कंबरडं मोडलं आहे. शेतकऱ्यांपुढे कौटुंबिक उदरनिर्वाहाचे प्रश्न उभे राहिले आहेत. अशावेळी शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची आस लागलेली असते. मात्र सरकारकडून अद्याप कोणत्याही प्रकारच्या आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांप्रती उदासीन असल्याचा उघड आरोप आता विरोधकांकडून होऊ लागला आहे. 

जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आस्मानी संकटात होरपळला जात असतांना सरकार मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याने सरकारला झोपेतून जागे करण्याकरिता शिवसेना (उबाठा) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. निसर्गाच्या कोपाने उद्धवस्त झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरिता शिवसेना पक्षाच्या वतीने वणी तहसील कार्यालयासमोर डफडे आंदोलन करण्यात येणार असून यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना सरसकट अनुदान जाहीर करा आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा या रास्त मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी करण्यात येणाऱ्या या आंदोलनात तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांनी केले आहे.  

No comments:

Powered by Blogger.