वणी नगरपालिकेच्या करवाढीविरोधात काँग्रेसचा हल्लाबोल ! “हुकुमशाही थांबवा; करवाढ मागे घ्या” – काँग्रेसचा इशारा
प्रशांत चंदनखेडे वणी :-
वणी नगरपालिकेच्या नव्याने लादलेल्या मालमत्ता करवाढीविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. सोमवार, दि. २२ सप्टेंबर रोजी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पालिकेवर धडक देत करवाढीविरोधात जोरदार आवाज उठवला. काँग्रेस प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी काँग्रेसने स्पष्ट इशारा दिला की, “जर करवाढ मागे घेतली नाही, तर रस्त्यावर उतरून मोठे जनआंदोलन छेडले जाईल.”
दुप्पट करवाढीने वणीकरांवर बोजा
नगरपालिकेने नुकतीच जारी केलेली करवाढ मागील कराच्या जवळपास दुप्पट असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही आकारणी पुढील चार वर्षांसाठी लागू करण्यात येणार असून, नागरिकांवर मोठा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. याबाबत कोणताही ठराव न घेता किंवा समितीची बैठक न घेता थेट निर्णय घेण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला.
काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांनी प्रशासनावर टीका करताना सांगितले, “आधीच महागाई व वाढत्या वीजदरांनी सर्वसामान्य त्रस्त आहेत. त्यात पालिकेने जाचक करवाढ करून सर्वसामान्यांच्या खिशावर विनाकारण भार लादला आहे. स्वातंत्र्यापूर्वी इंग्रज जसे दुप्पटी तिप्पटीने लगान वसूल करायचे, तशीच कर वसुली नगर पालिकेने सुरु केली आहे. नगर पालिका प्रशासन अन्यायकारक धोरणांचा अवलंब करीत असून अधिकारी हुकुमशाही पद्धतीने निर्णय घेत आहेत. परंतु नगर पालिकेने जनतेवर लादलेला हा अवाजवी मालमत्ता कर काँग्रेस कदापिही खपवून घेणार नाही, असा निर्वाणीचा इशारा यावेळी काँग्रेस नेते संजय खाडे यांच्या कडून देण्यात आला.
निवेदनात काँग्रेसने पालिकेच्या कामकाजावर थेट निशाणा साधला. गेल्या दोन-तीन वर्षांपासून शहरात अनियमित पाणीपुरवठा सुरूच आहे. पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे व डबकी निर्माण होत आहेत. झाडाझुडपांची विल्हेवाट लावण्यातही पालिका अपयशी ठरली आहे. “कामकाजात अपयश, विकासात ढिलाई आणि त्यात करवाढीचा जाच – हे वणीकरांच्या डोक्यावर लादलेले ओझे आहे,” असा आरोप काँग्रेसने केला.
काँग्रेसची ताकद दाखवणारी उपस्थिती
न.प. मुख्याधिकारी यांना निवेदन देतांना काँग्रेसचे अशोक चिकटे, प्रफुल्ल उपरे, रामदास कुचनकर, संदीप कांबळे, रवी कोटावर, राजू डवरे, राजाभाऊ पाथ्रडकर, प्रेमनाथ मंगाम, कैलास पचारे, सुधीर खंडाळकर, कैसर पटेल, ओम ठाकूर, विकेश पानघाटे, अशोक पांडे, राजू अंकितवार, गणेश बोंडे, तोशीब अहमद, सुमित डवरे, विनीत तोडकर, संजय शेंडे, नरेंद्र काटोके यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने काँग्रेसचे उपस्थित होते.
पुढे काय?
काँग्रेसच्या या इशाऱ्यामुळे नगरपालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील काही दिवसांत हा वाद तापण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे वणीकरांचे लक्ष आता पालिकेच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.
No comments: