Latest News

Latest News
Loading...

पारवा–घोन्सा–वणी मार्गावरील कामावर प्रश्नचिन्ह ! मनसेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; अवैध उत्खनन व निकृष्ट दर्जाच्या कामाचा आरोप

प्रशांत चंदनखेडे वणी :-

पारवा–घोन्सा–वणी मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग ३१४ (SH-314) वरील कामाच्या दर्जावर आता थेट प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या कामात मोठ्या प्रमाणावर अवैध मुरुम–खडी उत्खनन तसेच निकृष्ट दर्जाचे बांधकाम सुरू असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला असून, मनसे नेते राजू उंबरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे थेट तक्रार करून दोषींवर तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

मनसेच्या तक्रारीनुसार पारवा–केळापूर–शिबला–घोन्सा–वणी मार्गावर (किमी ४०/००० ते ७७/५००) सुरू असलेले काम अत्यंत निकृष्ट आहे. कामासाठी लागणारा मुरुम व खडी अवैधरित्या उत्खनन करून आणला जात असल्याचे पुरावे मनसे कार्यकर्त्यांनी सादर केले आहेत. निमणी परिसरातील पाहणीत शेतजमिनीत विनापरवानगी मुरुम उत्खनन सुरू असल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा करण्यात आला. अधिकृत परवानगी एका ब्रासची असताना प्रत्यक्षात पाच-पाच ब्रास मुरुम ट्रकमध्ये भरून नेण्यात येतो; अशा प्रकारे हजारो ब्रास मुरुमाची लूट होत असून, शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतो आहे, असा आरोप उंबरकरांनी केला.

यापूर्वी १७ सप्टेंबर रोजी उंबरकरांनी झरी येथील तहसीलदारांना ही बाब निदर्शनास आणून दिली होती. मात्र कारवाई न झाल्याने त्यांनी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे. एवढेच नव्हे तर कामासाठी लागणारी खडी वणी तालुक्यातील मोहदा खाणीतूनही अवैधरित्या काढली जात असल्याचा ठपका मनसेने ठेवला आहे.

मनसेच्या प्रमुख मागण्या

💥निमणी व मोहदा येथील खाणींची ई.टी.एस. (Electronic Total Station) मशीनद्वारे तातडीने मोजणी करावी.

💥महसूलातील तफावत उघड झाल्यास ती संपूर्ण वसूल करावी.

💥संबंधित ठेकेदारांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करावी.

💥रस्ते कामाच्या गुणवत्तेसाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी.

आंदोलनाची चेतावणी

राजू उंबरकर यांनी इशारा दिला की, “जर आठ दिवसांत ठोस कारवाई झाली नाही, तर मनसे लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल.”

📌 बॉक्स

"महसूल विभागाच्या नजरेसमोर खुलेआम गौण खनिजाची लुट सुरू आहे. एवढं असूनही कारवाई होत नाही, हे आश्चर्यकारक आहे. कारवाई झाली नाही, तर मनसे रस्त्यावर उतरेल."– राजू उंबरकर, नेते, मनसे


No comments:

Powered by Blogger.