अतिवृष्टीने शेत पिकांचं अतोनात नुकसान होऊनही सरकार कुंभकर्णी झोपेत, सरकारला जागे करण्याकरिता शिवसेनेचं (उबाठा) डफडे आंदोलन
प्रशांत चंदनखेडे वणी :-
नैसर्गिक आपत्तीने शेतीचं मोठं नुकसान झालं असून शेतकरी प्रचंड विवंचनेत आला आहे. निसर्गाच्या लहरीपणाचे घाव सोसताना शेतकरी पार कोलमडला आहे. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ झेलणारा शेतकरी पार नैराश्येत आला आहे. कधी शेतात पेरलेलं उगवत नाही तर कधी उगवलेलं हाती येईल की नाही, याची शाश्वती राहत नाही. निसर्गाच्या सतत होणाऱ्या कोपामुळे शेतकरी पुरता हादरला आहे. नापिकीमुळे शेतकरी आर्थिक डबघाईस आला आहे. शेतात अतोनात कष्ट व घाम गाळूनही संसाराचा गाडा हाकता येईल एवढंही पदरात पडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी बऱ्यापैकी उत्पन्न होईल अशी आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांवर यावेळीही निसर्गाची अवकृपा झाली. निसर्गाने गद्दारी आणि पावसाने बंडखोरी केली.
पावसाच्या धोकाधडीने शेतकऱ्यांचं हिरवंगार स्वप्न धुळीस मिळालं. शेतात डौलणारी पिके पाण्यात बुडाली. निसर्गाने थट्टा केली पण मायबाप सरकार तरी आधार देईल, या विश्वासावर शेतकरी असतांना सरकारनेही अद्याप मदतीची कोणतीही घोषणा केली नाही. अतिवृष्टीने शेतातील पिके करपल्याने शेतकऱ्यांची प्रचंड वाताहत झाली असून त्यांच्या जगण्या मरण्याचे प्रश्न निर्माण झालेले असतांना महायुती सरकार शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याऐवजी त्यांचा अंत पाहत आहे. जगाच्या पोशिंद्यावर आस्मानी संकट कोसळलेलं असतांना सरकार कुंभकर्णी झोपेत असल्याने सरकारला झोपेतून जागे करण्याकरिता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने वणी तहसील कार्यालयासमोर मंगळवारी दुपारी डफडे आंदोलन करण्यात आले.
वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनात व शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे शेतकरी कुटुंबातील महिला आणि शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांचीही उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी शिवसेनेच्या वतीने डफडे वाजवून महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. शेतकरी ओल्या दुष्काळात पुरता भरडला गेला असतांना शासनाकडून मात्र अजूनही आर्थिक मदतीची घोषणा करण्यात न आल्याने सरकारला झोपेतून जागे करण्याकरिता शिवसेनेने हे अनोखे आंदोलन केले.
वणी उपविभागासह संपूर्ण जिल्ह्यातच कोसळलेल्या मुसळधार व संततधार पावसामुळे शेत पिकांचे प्रचंड नुकसान झाले. पावसाच्या पाण्यामुळे शेतात तळे साचल्याने उभी पिके पाण्यात बुडाली. अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला. शेतात शेततळे तयार झाल्याने शेतातील पिके करपली. शेतात उगवलेलं अख्ख पिक हातून गेल्याने शेतकरी प्रचंड विवंचनेत आला आहे. त्याच्यावर आभाळ कोसळलं आहे. शेत पिकांच्या लागवडीवर केलेला खर्चही व्यर्थ गेला आहे. शेती पिकविण्यासाठी केलेला खर्च व घेतलेल्या मेहनतीवर निसर्गाने पाणी फेरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तो आर्थिक संकटात आला आहे. शेतकऱ्यांसमोर आता कौटुंबिक उदरनिर्वाहाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. अतिवृष्टीने शेतीची प्रचंड हानी झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळलं आहे. अतिवृष्टीमुळे शेतातील पिके पूर्णतः नष्ट झाल्याने शेतकऱ्यांची मोठी परवड व दैना झालेली असतांना सरकार मात्र अशा विदारक परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याऐवजी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहे.
शेत पिकांचे अतोनात नुकसान होऊनही शासनाकडून अजूनही आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आलेली नाही. शेत पिकांचे पंचनामे करण्यातही दिरंगाई होतांना दिसत आहे. जिल्ह्यात अतिवृष्टी होऊनही यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे कुंभकर्णी झोपेत असलेल्या महायुती सरकारला झोपेतून जागे करण्याकरिता शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने आज तहसील कार्यालयासमोर डफडे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेना पक्षाच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना सरसकट अनुदान जाहीर करा व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा आदी मागण्या करण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
No comments: