Latest News

Latest News
Loading...

वणी पोलिसांची वरळी मटका जुगारावर धडक कारवाई : तेलंगणातील इसम व मटका मालकावर गुन्हा दाखल, १७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहरातील रंगनाथ नगर परिसरात सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून मटका पट्टी फाडणाऱ्या इसमाला ताब्यात घेतले. ही धडक कार्यवाही २४ सप्टेंबरला सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी मटका पट्टी फाडतांना रंगेहात सापडलेल्या इसमासह मटका अड्डा चालविणाऱ्या मालकावरही गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी १७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिस उपनिरीक्षक अंकुश वडतकर हे २४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी पोलिस पथकासह शहरात गस्त घालत असतांना त्यांना रंगनाथ नगर येथील हनुमान मंदिराजवळ राजरोसपणे मटका अड्डा सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यामुळे माहिती मिळालेल्या ठिकाणी ते पोलिस पथकासह पोहचले असता त्यांना रंगनाथ नगर परिसरातील हनुमान मंदिराच्या मागे सार्वजनिक खुल्या मैदानातील बंद टपरी जवळ एक इसम एका मोठ्या दगडावर बसून मटका पट्टी फाडतांना आढळून आला. एका छोट्या पावतीवर मटक्याचे आकडे लिहून देत तो लोकांकडून पैसे घेत होता. मटक्याच्या आकड्यावर पैशाचा जुगार खेळवणाऱ्या या इसमाला पोलिसांनी जराही चाहूल न लागू देता मोठ्या शिताफीने अटक केली.

पोलिसांनी त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने संदीप कृष्णय्या चिलूकला (५५, रा. जनराम कॉलनी, कवडपल्ली, जि. रंगारेड्डी, तेलंगणा) असे सांगितले. त्याला मटका अड्डा कोणाच्या मालकीचा आहे, अशी विचारणा केली असता त्याने अफसर शेख अजीज शेख (रा. वाघदरा, ता. वणी) याच्या मालकीचा हा मटका अड्डा असल्याचे सांगतानाच मटका जुगारातून गोळा झालेली सर्व रक्कम तो अफसर शेख याच्याकडे जमा करीत असल्याचे सांगितले. त्याबदल्यात त्याला रोजंदारीप्रमाणे १,००० रुपये मिळत असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.

वरळी मटक्याचे आकडे लिहीताना रंगेहात सापडलेल्या इसमाची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ पोलिसांना दोन अँड्रॉईड मोबाईल व रोख ७ हजार ५०० रुपये मिळाले. या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून मटक्याच्या साहित्यासह एकूण  १७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी पोलिसांनी संदीप कृष्णय्या चिलूकला व अफसर शेख अजीज शेख या दोन्ही आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) व सहकलम ४९ भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वडतकर करत आहेत. अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या दिशेने पोलिसांची धडक कार्यवाही सुरु असून मागील काही दिवसांपासून पोलिसांनी उघड व छुप्या पद्धतीने सुरु असलेल्या मटका अड्ड्यांवर धाडसत्र अवलंबले आहे. तरीही मटका बहाद्दर विविध शकली लढवून मटका अड्डे चालवत आहेत. 

शहरासह ग्रामीण भागात अजूनही कुठे उघड तर कुठे छुप्प्या पद्धतीने मटक्याचा खेळ सुरूच असून पोलिसांच्या कारवाई नंतरही मटका जुगारावर पायबंद लागत नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मटक्यावरील पोलिसांच्या कार्यवाहीला कुणीही गांभीर्याने घेतांना दिसत नाही. मटका अड्डे चालवणाऱ्या अवैध व्यावसायिकांवर कित्येकदा कार्यवाही झाली. पण मटका अड्डे मात्र बंद झाले नाहीत. तेंव्हा याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. 


No comments:

Powered by Blogger.