प्रशांत चंदनखेडे वणी :-
सरकारी नोकरी करत प्रवाशांची सेवा करणाऱ्या बसचालकावरच आता गाव गुंडांनी हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना वणी तालुक्यात घडली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वणी आगारातील बस चालकाला मोटरसायकलस्वाराने रस्त्यात बस अडवून शिवीगाळ केली, कॉलर पकडून बसखाली ओढले आणि काठीने जबर मारहाण केली. या गुंडगिरीमुळे एसटी कर्मचाऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे.
आज, शुक्रवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. वणी आगाराची वणी-बोर्डा ही बस (MH 40 AQ 6062) बोर्डा येथे विद्यार्थ्यांना आणण्यासाठी जात असताना, विरकुंड–बोर्डा मार्गावर मोटरसायकल (क्रमांक MH 29 BW 8150) वरून आलेल्या पायघन (रा. बोर्डा) या इसमाने बसला अडवले. चालकाने रस्ता दिला तरी हा इसम फुकट नोकरी लागल्याचा आरोप करत बस चालकावर संतापाने तुटून पडला.
मोटरसायकलस्वाराने बस चालकाची कॉलर धरून बसबाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाहक संजय नान्ने मदतीला धावून आला, मात्र दरम्यान पायघन याने लाकडी काठीने चालकाच्या उजव्या खांद्यावर प्रहार केला. ही घटना पाहून प्रवाशांमध्ये व ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली.
सरकारी कामात अडथळा आणत बस चालकावर हल्ला करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविण्यात आली आहे. पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेत तपास सुरू केला असून, या प्रकरणाने गावात वाढत्या दादागिरीचा आणि कायद्याला न जुमानणाऱ्या प्रवृत्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे.
No comments: