प्रशांत चंदनखेडे वणी :-
भारतीय जनता पार्टी वणी शहराच्या वतीने बाप्पा माझा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत शिंपी समाज गणेशोत्सव मंडळानेही सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील विजेत्या मंडळांमध्ये शिंपी समाज गणेशोत्सव मंडळाला संपूर्ण शहरातून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. शिंपी समाज गणेशोत्सव मंडळाने या स्पर्धेत स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा संदेश देणारा आकर्षक व उत्कृष्ट देखावा सादर केला होता. या देखाव्याने परीक्षकांचे लक्ष वेधले आणि या देखाव्याला द्वितीय क्रमांक देण्यात आला.
तालुका शिंपी समाज संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी बाप्पा माझा या स्पर्धेत हा उत्तम देखावा सादर करण्याकरिता मोलाचे सहकार्य केले. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यात या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यकर्ता मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले माजी वनमंत्री व विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शिंपी समाज गणेशोत्सव मंडळाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख ३ हजार रुपये, सन्मान चिन्ह आणि झाडाचं रोपटं देऊन मंडळाला द्वितीय पुरस्काराने गौरविण्यात आले. बाप्पा माझा या स्पर्धेत संपूर्ण शहरातून शिंपी समाज गणेशोत्सवाला द्वितीय पारितोषिक मिळाल्याने मंडळाच्या सर्व स्पर्धकांवर व सभासदांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शिंपी समाज गणेशोत्सव मंडळाला जवळपास १०७ वर्षांची परंपरा लाभली असून ब्रिटिशपूर्व काळापासून हे मंडळ अस्तित्वात असल्याचे मंडळाचे सचिव दिपक दिकुंडवार यांच्या कडून सांगण्यात येत आहे. शिंपी समाज गणेशोत्सव मंडळाकडून दरवर्षी उत्साहपूर्ण पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. याकाळात दहाही दिवस विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. प्रबोधनात्मक कार्यक्रमातूनही जनजागृती करण्यात येते.
सन २०१८ साली मंडळाचे शताब्दी वर्ष साजरे करण्यात आले. त्यावेळी मंडळाकडून दहाही दिवस भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले होते. त्यावेळीही शिंपी समाज गणेशोत्सव मंडळाला नगर पालिका, पोलिस स्टेशन व प्रशासनाकडून उत्तम आयोजनाबद्दल पुरस्कार मिळाले होते. आजही नियोजनबद्ध पद्धतीने या मंडळाकडून गणेशोत्सव साजरा करण्यात येतो, आणि या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यक्रमांची प्रशासनाकडून दखलही घेण्यात येते. यावर्षी या मंडळाला बाप्पा माझा स्पर्धेत स्वदेशीचा पुरस्कार करणारा देखावा सादर केल्याने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.
No comments: