"शेवटच्या पंक्तीतल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याची ताकद आपल्या कार्यात असली पाहिजे" – आमदार सुधीर मुनगंटीवार
प्रशांत चंदनखेडे वणी :-
श्रद्धेय पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती हा केवळ स्मरणाचा दिवस नाही, तर त्यांच्या एकात्म मानववादाच्या तत्त्वज्ञानाला कार्यात उतरवण्याचा प्रेरणादायी क्षण आहे. वणी येथे आयोजित भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी याच भावनेला उजाळा दिला. "समाजातील शेवटच्या पंक्तीत बसलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याची ताकद आपल्या कार्यात असली पाहिजे. खरी प्रगती ही विकासाच्या आकडेवारीत नव्हे तर शेवटच्या घटकाच्या उन्नतीत मोजली जाते," अशा शब्दांत त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना नवा संकल्प दिला.
राजकारण म्हणजे केवळ सत्ता मिळवण्याचे साधन नसून विचारांची आणि मूल्यांची साधना आहे, हा संदेश त्यांनी अधोरेखित केला. "भारतीय जनता पक्ष ही केवळ राजकीय संघटना नाही, तर एक विचारधारा आहे. काळ बदलतो, परिस्थिती बदलते; पण पक्षाचे मूल्य व तत्त्वे शाश्वत असतात," असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना पक्षाच्या आत्म्याशी एकरूप राहण्याचे आवाहन केले.
शहरातील एस.बी. लॉन येथे आयोजित या मेळाव्यास पालकमंत्री अशोक उईके, माजी आमदार संजिव रेड्डी बोदकुरवार, ललिता बोदकुरवार, माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, दिनकर पावडे, विजय पिदुरकर, संजय पिंपळशेंडे, रवि बेलूरकर, कुणाल चोरडीया, संतोष डंभारे, श्रीकांत पोटदुखे, तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व कामगार संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन भाजपचे शहराध्यक्ष ऍड. निलेश चौधरी यांनी केले.
No comments: