प्रशांत चंदनखेडे वणी :-
महाराष्ट्रातील मूळ आदिवासींच्या आरक्षणावर डल्ला मारण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या निषेधार्थ आदिवासी हक्क व आरक्षण बचाव कृती समितीच्या (वणी, झरी व मारेगाव) नेतृत्वात सोमवार २९ सप्टेंबर रोजी वणी उपविभागीय कार्यालयावर भव्य ‘आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे.
हा मोर्चा काढण्याच्या उद्देशाबाबत समितीने स्पष्ट केले की, बंजारा व धनगर समाजाला आदिवासी आरक्षणात समाविष्ट करण्याचा प्रयत्न संविधानविरोधी व अन्यायकारक आहे. आधीच या समाजांना स्वतंत्र आरक्षण देण्यात आलेले असूनही आदिवासी आरक्षणावर हक्क सांगणे हा मूळ आदिवासींच्या अस्तित्वावर घाला आहे.
🔻 समितीचा ठाम इशारा
बंजारा व धनगर समाज हा अनुसूचित जमातीचा भाग नाही, तसेच आदिवासी निकषांना तो पात्र ठरत नाही.
बलाढ्य व आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या या समाजांना आदिवासींमध्ये सामावून घेतले तर मूळ आदिवासी समाज शिक्षण, नोकरी व राजकीय प्रतिनिधित्वातून पूर्णपणे वंचित राहील.
संविधानाच्या चौकटीत राहून आदिवासींना दिलेले आरक्षण हे आदिवासी बांधवांच्या ‘जिवंत राहण्याचा आधार’ आहे. त्यामुळे हा हक्क हिरावून घेण्याचा कुठलाही प्रयत्न आम्ही सहन करणार नाही.
🔻 आंदोलनाचे स्वरूप
आदिवासी समाजाने आपल्या अस्तित्वाचा लढा उभारण्यासाठी या मोर्च्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन समितीकडून करण्यात आले आहे. “हा मोर्चा म्हणजे केवळ मागणी नव्हे, तर मूळ आदिवासींच्या जगण्याच्या हक्कासाठीचा आक्रोश आहे,” असे समितीचे म्हणणे आहे.
🔻 मोर्चा वणी शहराचे लक्ष वेधणार
हा मोर्चा ऐतिहासिक ठरण्याची चिन्हे आहेत. वणी शहरात हजारोंच्या संख्येने आदिवासी समाज रस्त्यावर उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, प्रशासन व राजकीय वर्तुळाचेही या आंदोलनाकडे विशेष लक्ष लागले आहे.
No comments: