प्रशांत चंदनखेडे वणी :-
तालुक्यातील गणेशपूर ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या छोरीया ले-आऊटमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलांमध्ये काही कारणांवरून भांडण झाल्यानंतर त्यांच्या पालकांमध्येही वाद उफाळून आला. मात्र हा वाद नंतर सामंजस्याने मिटविण्यात आला. दरम्यान दुसऱ्या दिवशी मुलांचे पालक एकमेकांशी चर्चा करीत असतांना आमेर टॉवर-३ मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने त्यात हस्तक्षेप केला. मात्र लहान मुलांच्या वादाशी त्या व्यक्तीचा कुठलाही संबंध नसल्याने मुलांच्या पालकांनी त्याला यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. परंतु त्या व्यक्तीने आपापसात चर्चा करणाऱ्या पालकांशीच वाद घालायला सुरवात केली. एवढेच नाही तर मोटारसायकलवरील दांडा काढून त्याने मुलांच्या पालकांवर उगारला. मात्र हा दांडा तेथे उपस्थित असलेल्या पालकांपैकी एका महिलेच्या डोक्यावर लागला. त्यामुळे तिचे डोके फुटून ती जखमी झाली. याबाबत महिलेने पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीनेही महिलेच्या पती व अन्य दोन जणांविरोधात आधीच तक्रार केली आहे, हे याठिकाणी उल्लेखनीय.
गणेशपूर येथील छोरीया ले-आऊट परिसरातील ओमकार अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या निलीमा प्रभुज्योत उमरे (४१) यांच्या तक्रारी नुसार, त्यांना दंडा मारून जखमी करणारा आरोपी भावेश विठ्ठल हरपरवार (४२) हा ओमकार अपार्टमेंट लगत असलेल्या आमिर टॉवर-३ मध्ये राहतो. २५ सप्टेंबरला येथील लहान मुलांमध्ये काही कारणांवरून वाद झाला. त्यानंतर त्याची धग पालकांपर्यंत पोहचली. मुलांच्या भांडणाचे पडसाद पालकांमध्ये उमटले. मुलांच्या खोडकरी कृत्याचे परिणाम व रूपांतर नंतर पालकांच्या वादात झाले. मात्र नंतर पालकांनी आपसी सामंजस्याने आपसातील हा वाद मिटविला.
त्यानंतर २६ सप्टेंबरला रात्री १० वाजता प्रभुज्योत उमरे व निलीमा उमरे तसेच फिरोज अन्सारी हुसैन अन्सारी व मोनी अन्सारी आणि तेथील नागरिक हे मुलांच्या झालेल्या भांडणावरून चर्चा करीत असतांना भावेश हरपरवार हा तेथे आला. आणि त्याचा मुलांच्या भांडणाशी काही एक संबंध नसतांना तो पालकांच्या चर्चेत हस्तक्षेप करू लागला. त्यावर पालकांनी मुलांच्या वादाशी तुमचा काहीही संबंध नसतांना तुम्ही उगीच यात हस्तक्षेत का करीत आहे, असे म्हटले असता भावेश चांगलाच चिडला. त्याने फिरोज अन्सारी व प्रभुज्योत उमरे यांच्याशी वाद घालत दुचाकीवरील दांडा त्यांच्यावर भिरकावला. मात्र तो दांडा निलीमा उमरे यांच्या डोक्याला लागला. त्यामुळे त्यांचे डोके फुटून त्यातून रक्तस्त्राव होऊ लागला.
डोक्यावर दांड्याचा मार बसल्याने निलीमा यांना चक्कर आली. त्यानंतर त्यांच्या पतीने त्यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी २७ सप्टेंबरला भावेश हरपरवार याच्या विरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. निलीमा उमरे यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी भावेश हरपरवार याच्यावर बीएनएसच्या कलम ११८(१), ३५१(२)(३), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे. विशेष म्हणजे भावेश हरपरवार यांनी निलीमा यांचे पती प्रभुज्योत उमरे, फिरोज अन्सारी व एका विधिसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध याआधीच मारहाणीची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या परस्परविरोधी तक्रारींमुळे प्रकरण आणखीच गुंतागुंतीचं झालं आहे.
No comments: